मास्क काढून रुग्णांच्या गप्पा पाहिल्यावर सुचला ऑक्सिजन बचतीचा ‘फॉर्म्युला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:23+5:302021-04-24T04:12:23+5:30
पुणे :ऑॅक्सिजनवर ठेवण्याची वेळे येते म्हणजे रुग्ण गंभीर. परंतु, पुण्यातील जम्बो रुग्णालयात ऑॅक्सिजन मास्क काढून काही जण मोबाईलवर बोलताना, ...
पुणे :ऑॅक्सिजनवर ठेवण्याची वेळे येते म्हणजे रुग्ण गंभीर. परंतु, पुण्यातील जम्बो रुग्णालयात ऑॅक्सिजन मास्क काढून काही जण मोबाईलवर बोलताना, १०-१५ मिनिटे गप्पा मारताना सीसीटीव्हीत दिसले. यातूनच ऑॅक्सिजन बचतीची आणि योग्य वापराची कल्पना महापालिका अधिकाऱ्यांना सुचली. गरज नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले. त्यामुळे पुण्यात एकाच दिवसात १३ टन ऑॅक्सिजनची बचत झाली आहे.
महापालिकेने केलेल्या या यशस्वी प्रयोगाची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव अधिकाऱ्यांची टीम पाठविली होती. इतर ठिकाणीही हा प्रयोग केला जाणार आहे.
गेल्या आठवड्यापासून शहरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. पालिकेलाही मागणीपेक्षा ७-८ टन कमी ऑक्सिजन मिळत आहे. सर्वाधिक ७०० रुग्ण उपचार घेत असलेल्या जम्बो कोविड सेंटरला दिवसाला १८ ते २० टन ऑक्सिजन लागतो. बुधवारी ऑक्सिजनचा पुरवठा होणार नव्हता. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजनमध्ये कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे हे जम्बो कोविड सेंटरचे समन्वयक आहेत. काही रुग्ण ऑक्सिजन काढून मोबाईलवर बोलत असल्याचे त्यांनी सीसीटीव्हीमध्ये पाहिले. ते ऑक्सिजनशिवाय काही काळ राहू शकतात, असे लक्षात येताच त्यांनी अतिरिक्त मनुष्यबळ जम्बोमध्ये लावले. दर दोन ते तीन बेडच्यामध्ये डॉक्टर आणि कर्मचारी उभे केले. रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासली. ज्यांची पातळी उत्तम आहे आणि ज्यांना ४ लिटरच्या आत ऑक्सिजन लागतो त्यांचा ऑक्सिजन मास्क काढून ठेवला जात होता. पुरवठ्याचा वेग काही काळ कमी केला. ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवून पुन्हा थोड्या वेळाने ऑक्सिजन लावला जात होता. हा प्रयोग रात्रभर सुरू होता.
ऑक्सिजनची आवश्यकता असलेले आणि आवश्यकता नसलेल्या रूग्णांना वेगळे करण्यात आले. ऑक्सिजनची आवश्यकता नसलेल्या रुग्णांना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. यामुळे ऑक्सिजनची बचत झाल्याचे मुठे यांनी सांगितले. या प्रक्रियेवर व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत होते. या काळात रुग्णांची विशेष काळजी घेतली जात होती. रुग्णांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घेतली जात होती.