Oxygen Shortage : मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा कमीच; जिल्ह्याला रोज ३५० ते ३७० मेट्रिक टनची आवश्यकता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 09:28 PM2021-04-30T21:28:58+5:302021-04-30T21:29:07+5:30
शुक्रवारी केवळ ३१७ मेट्रिक टनचा पुरवठा....
पुणे : जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. जिल्ह्याला रोज ३५० ते ३७० मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात ३०० ते ३१५ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा रोज जिल्ह्याला होत आहे. ही तुट भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न सरू असून मुंबई, ठाणे, मुरबाड तसेच परराज्यातून ऑक्सिजन टॅकरद्वारे पुरवला जात आहे. शुक्रवारी काही गाड्यांमध्ये समस्या निर्माण झाल्याने ३१७ मेट्रिक टन ऑक्सिजन चा पुरवठा जिल्ह्याला झाला.
जिल्ह्यासह राज्यातील अनेक शासकीय रूग्णालये, कोविड केअर सेंटर तसेच खासगी रूग्णालयांना ऑक्सिजनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, असे असतानाही पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही त्याचा पुरवठा होत नसल्याने रूग्णांचे हाल सुरूच आहे. तो नसल्याने पुणे शहरातील काही रूग्णांना नव्या रूग्णांना दाखल करून घेण्यास अडचणी आल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्येही ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यात नवे प्रकल्प उभे राहण्यास विलंब लागत असल्याने त्यात आणखी भर पडत आहे.
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुरबाड, मुंबई, ठाणे जामनगर येथून टँकरच्या साह्याने जिल्ह्यात तो आणले जात आहे. यातील काही टँकर वेळेवर पोहचतात मात्र, काही टँकर तांत्रिक कारणांमूळे वेळेत पोहचू शकत नसल्याने हा तुटवडा निर्माण होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. बी.पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात ऑक्सिजनच्या नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्न व औषध प्रशासन विभागा तर्फे त्याच्या पुरवठ्याचे नियोजन केले जाते. मात्र, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही रोज वाढ होत आहे.
पुण्यातील प्रकल्पातून इतर जिल्ह्यांनाही पुरवठा
जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीच्या प्रमुख प्रकल्प आहेत तर दोन एअर सेप्रेशन प्रकल्प आहेत. येथे निर्माण होणारा ऑक्सीजनचा पुरवठा जिल्ह्यासह औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागालाही केला जातो. यामुळे जिथे अतिरिक्त ऑक्सिजन आहे. त्या ठिकाणाहून तो जिल्ह्याला पुरवला जातो. मात्र, त्या ठिकाणीही मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात जिल्ह्याला होत आहे.