Corona Virus Pune : आरोग्य यंत्रणाच ‘ऑक्सिजन’ वर ; मागणीच्या तुलनेत ३० टक्के कमी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:59+5:302021-04-15T11:05:37+5:30

लक्ष्मण मोरे-  पुणे : शहरात कोरोनाची दुसरी लाट येऊन थडकल्यानंतर ‘ऑक्सिजन’च्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये प्रतिदिन ३० ...

Corona Virus Pune: Health system on 'Oxygen'; 30% less supply than demand | Corona Virus Pune : आरोग्य यंत्रणाच ‘ऑक्सिजन’ वर ; मागणीच्या तुलनेत ३० टक्के कमी पुरवठा

Corona Virus Pune : आरोग्य यंत्रणाच ‘ऑक्सिजन’ वर ; मागणीच्या तुलनेत ३० टक्के कमी पुरवठा

Next

लक्ष्मण मोरे- 

पुणे : शहरात कोरोनाची दुसरी लाट येऊन थडकल्यानंतर ‘ऑक्सिजन’च्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये प्रतिदिन ३० ते ४० टन मागणी होती. मात्र, मार्च आणि एप्रिलमध्ये ही मागणी दहा पट वाढली आहे. आजमितीस शहरात दिवासाकाठी ३५० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ३० टक्के कमी पुरवठा होत आहे. त्यातच राज्य शासनाने मराठवाड्याला १५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितल्याने भविष्यात आणखी तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरातील ऑक्टोबरनंतर कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढत गेली आहे. मार्च महिना सर्वाधिक घातक ठरला आहे. याकाळात ऑक्सिजनवरील आणि व्हेंटिलेटरवरील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रुग्णालयांमध्ये दोन्ही प्रकारच्या खाटा उपलब्ध होण्यामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. शहरातील खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा काही दिवसांपासून कमी होत आहे. रुग्ण वाढल्याने मागणी वाढली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून हा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

शहराला आजमितीस लागणाऱ्या ऑक्सिजनच्या ३० टक्के पुरवठा होत आहे. त्यामुळे भविष्यात रुग्ण वाढत गेल्यास आणखी ऑक्सिजन उपलब्ध करण्याची कसरत एफडीएसह पालिकेला करावी लागणार आहे.

-----

कोठून होतो पुरवठा?

रुग्णांसाठी आवश्यक असलेला ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन’चे उत्पादन महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नागपूरमध्ये होते. राज्यात दर दिवसाला १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. पुण्यात चाकणमध्ये तीन प्लान्ट आहेत. याठिकाणांहून पुण्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.

---

नागपूरहून होणारा पुरवठा मागील काही दिवसांपासून कमी झाला आहे. नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वाढलेल्या रुग्णासंख्येमुळे ऑक्सिजनची मागणी तिकडेही वाढली आहे. त्यामुळे नागपूरहुन त्याच भागातील रुग्णालयांना पुरवठा होत आहे.

--

जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मागणी कमी होती. परंतु, १५ मार्च आणि १ एप्रिलनंतर या मागणीमध्ये ऑक्सिजनच्या वाढ झाली आहे.

--

मराठवाड्याला ऑक्सिजन

राज्य शासनाने मराठवाड्याला १५० मेट्रिक टन ऑक्सिजन पाठविण्याच्या सूचना एफडीएला दिलेल्या आहेत. त्यामुळे तिकडे ऑक्सिजन पाठविण्यात येत आहे. पुण्यासाठी ३५० मेट्रिक टन आणि मराठवाड्यासाठी १५० मेट्रिक टन अशा ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनची पूर्तता करावी लागत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा होण्याची शक्यता वर्तविली आहे.

--

पुण्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांशी एफडीएकडून सातत्याने संपर्क प्रस्थापित करण्यात येत आहे. रुग्णालय आणि पुरवठादार यांच्यामध्ये समन्वय साधण्यात येत आहे. कोरोना काळात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. सध्या मागणीनुसार पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑक्सिजन कमी पडत नसला तरी अगदी ''कट टू कट'' पुरवठा सुरू आहे.

- प्रमोद पाटील, अधिकारी, अन्न व औषध प्रशासन

--

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या ३५ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. ही मागणी ४० मेट्रिक टनापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या मागणीच्या तुलनेत ३० टक्के कमी पुरवठा होत आहे. हा पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

Web Title: Corona Virus Pune: Health system on 'Oxygen'; 30% less supply than demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.