हवेली तालुक्यात सोळा तासांहून अधिक काळ ऑक्सिजन पुरवठा बंद, रुग्णालयांमध्ये गोंधळाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 18:55 IST2021-04-21T18:55:12+5:302021-04-21T18:55:54+5:30
दौंड तालुका प्रशासनाची मनमानी

हवेली तालुक्यात सोळा तासांहून अधिक काळ ऑक्सिजन पुरवठा बंद, रुग्णालयांमध्ये गोंधळाचे वातावरण
उरुळी कांचन: कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजन तुटवड्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दौंड तालुका प्रशासनाने यवत येथील एका ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या प्लॅन्टमधून पूर्व हवेली तालुक्यात तसेच जिल्हयातील इतर भागांत होणारा ऑक्सिजन पुरवठा मनमानी पद्धतीने काल रात्री ८ पासून बंद केला आहे. अनेक रुग्णालयांतील ऑक्सिजनचा पुरवठा १६ तासहून अधिक काळ बंद राहिल्याने रुग्णालयात गोंधळ उडाला आहे.
दौंड तालुक्यातील यवत येथे गुरुदत्त एंटरप्राइजेस नामक ६ टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लॅन्ट आहे. या ऑक्सिजन प्लँटमधून पूर्व हवेली तालुक्यात तसेच जिल्ह्यातील अनेक भागांत ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. मंगळवारी दौंड तालुका प्रशासनाने उर्वरीत भागातील पुरवठा बंद करुन केवळ दौंड तालुक्यातील सर्व रुग्णालयांतील ऑक्सिजनची कमरता बघता फक्त दौंड तालुक्यापुरता पुरवठा सुरू ठेवला.
दौंड तालुक्यातील अनेक रुग्ण हवेलीच्या उरुळी कांचन शहरात उपचार घेत आहेत. या ठिकाणी पुरवठा बंद ठेऊन दौंडचा 'स्वाभिमान ' कमी होणार नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान दौंड प्रशासनाच्या या भूमिकेवर हवेलीकर संतप्त झाले असून पुढील काळात रेमडेसीवीर व ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास जिल्हाधिकाऱी कार्यालयावर ठिय्या मांडु असा इशारा भाजपचे युवा नेते अजिंक्य कांचन यांनी दिला आहे. "
दौंड तालुक्यातून हवेलीसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा मंगळवार रात्रीपासून बंद असल्याची बाब खरी आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबत कल्पना दिली आहे. त्यांच्या सूचने नुसार हवेली तालुक्यातील अधिकाऱ्यांचे पथक घेऊन मी स्वतःया ऑक्सिजन प्लॅन्ट मध्ये जाऊन पुरवठा सुरळीत करणार आहे. पुढील काही तासांतच तालुक्यातील पुरवठा सुरळीत होणार असल्याचे अतिरीक्त तहसीलदार विजयकुमार चौबे यांनी सांगितले आहे.