...अन् जम्बोमधील ऑक्सिजन पुरवठा दोन तासात सुरू झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:36+5:302021-04-20T04:12:36+5:30
पुणे : पुण्यातील जम्बो कोविड हाॅस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा संपत आल्याने हाॅस्पिटलच्या आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनच ऑक्सिजनवर जाण्याची वेळ ...
पुणे : पुण्यातील जम्बो कोविड हाॅस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा संपत आल्याने हाॅस्पिटलच्या आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनच ऑक्सिजनवर जाण्याची वेळ आली. परंतु जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तब्बल दोन-तीन तास फोनाफोनी करून यंत्रणा हलविली. अखेर चाकण येथील एका प्लॅन्टवरून सुमारे १५ मे.टन ऑक्सिजन जम्बो कोविड हाॅस्पिटलला पोहाेचला अन् सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
गेल्या एक दोन दिवसांपासून पुण्यासह संपूर्ण राज्यातच कोरोना रुग्णांसाठीचा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यासह देशात ऑक्सिजनची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत असली तरी केवळ पुरवठा व वितरण व्यवस्थेत अडचणी येत असल्याने हा तुटवडा जाणवत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले. पुण्यासह संपूर्ण राज्यातच कोरोना रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यामुळेच सध्या शंभर टक्के ऑक्सिजनचा वापर आरोग्य यंत्रणेसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी देखील वितरण व्यवस्थेतील अडचणीमुळे पुरवठा सुरळीत होत नाही. आता ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ॲम्ब्युलन्सचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच इतरही अडचणी दूर करण्यात येत आहे. यामुळे येत्या दोन तीन दिवसांत ऑक्सिजन पुरवठादेखील सुरळीत होईल.
-----
पुण्यासाठी थेट कर्नाटक मधून ऑक्सिजन पुरवठा
पुण्यासह संपूर्ण राज्यातच कोरोना रुग्णांची संख्या खूप वाढली आहे. यामुळेच रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. यामुळे राज्यातील ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा कमी पडू लागला आहे. यामुळेच आता अन्य राज्यांतून ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आला आहे. पुण्यासाठी कर्नाटक आणि गुजरात येथून ऑक्सिजन पुरवठा होत आहे.
------
पुण्यासाठी ५९०० रेमडेसिविरचा पुरवठा
गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण करणाऱ्या पुणेकरासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सोमवारी पुण्यासाठी सुमारे ५ हजार ९०० रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ५०० हाॅस्पिटलला मागणीनुसार हा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे आता काही प्रमाणात रुग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.