रुग्णालयांकडूनच ऑक्सिजनची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:11 AM2021-04-28T04:11:54+5:302021-04-28T04:11:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संपूर्ण देशात आणि पुणे जिल्ह्यातही ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. एक-दोन टन ऑक्सिजन मिळविण्यासाठीही प्रशासनाची ...

Oxygen wasted from hospitals | रुग्णालयांकडूनच ऑक्सिजनची उधळपट्टी

रुग्णालयांकडूनच ऑक्सिजनची उधळपट्टी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संपूर्ण देशात आणि पुणे जिल्ह्यातही ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. एक-दोन टन ऑक्सिजन मिळविण्यासाठीही प्रशासनाची दमछाक होत आहे. मात्र, रुग्णालयांकडूनच ऑक्सिजनची उधळपट्टी होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघड होत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व खाजगी व सरकारी हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट सुरू केले आहे. यामध्ये ऑक्सिजनच्या उधळपट्टीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील जम्बो कोविड हाॅस्पिटलमध्ये तर ५८ रुग्णांची क्षमता असलेल्या एका ऑक्सिजन वाॅर्डमध्ये एकही रुग्ण नसताना ऑक्सिजन वापर मात्र सुरू होता.

जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाने उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनचा काटेकोर वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही खाजगी व काही सरकारी हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट केले.

-------

अशी होतेय ऑक्सिजनची उधळपट्टी

* बहुतेक सर्व लहान-मोठ्या हाॅस्पिटल्समध्ये रुग्णाला गरजेपेक्षा अधिक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा दिला जातो.

* रुग्ण बाथरूमला गेल्यानंतर, जेवण करत असतानाही ऑक्सिजन चालूच ठेवला जातो.

- अनेक वेळा रात्री रुग्ण ऑक्सिजनचे मशिन बाजूला काढून झोपी जातात.

- ऑक्सिजनची फारशी गरज नसलेल्या रुग्णांनादेखील ऑक्सिजन पुरवठा सुरूच ठेवणे

-----------

ऑक्सिजन संपल्याच्या बोगस काॅलमुळे प्रशासनाची धावपळ

ऑक्सिजनचा पुरेसा साठा असतानादेखील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्याकडचा ऑक्सिजन पुरवठा संपल्याचा फोन काॅल जिल्हा प्रशासनाला केला. यामुळे पुण्याकडे निघालेला ऑक्सिजन टॅंकर पिंपरी-चिंचवडकडे वळविण्यात आला. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत संबंधित ऑक्सिजन पुरवठादाराला विचारणा केली असता पुरेसा ऑक्सिजन साठा शिल्लक असल्याचे सांगितले. तसा सविस्तर तपशील तातडीने व्हाॅट्सॲप केलं. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अधिकाऱ्यांच्या अशा बेजबाबदारपणाबद्दल देखील नाराजी व्यक्त होत आहे. विभागीय आयुक्तांना याबद्दलचा अहवाल सादर केला जाणार असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.

Web Title: Oxygen wasted from hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.