‘ऑक्सिजनरेटर’ रिक्षा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:50+5:302021-06-01T04:08:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षा पंचायत, जतन फाउंडेशन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने शहरात ‘ऑक्सिजनरेटर रिक्षा’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रिक्षा पंचायत, जतन फाउंडेशन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने शहरात ‘ऑक्सिजनरेटर रिक्षा’ हा उपक्रम सुरू होत आहे. कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचा ९१ वा वाढदिवस व इंडियन मेडिकल असोसिएशनचा ९३ वा वर्धापन दिन या निमित्ताने मंगळवारी (दि. ३१) दुपारी साडेचार वाजता विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात या सेवेचे लोकार्पण होईल.
रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी ही माहिती दिली. प्रकृती गंभीर असूनही रुग्णालय मिळत नाही अशा रुग्णाच्या घरी ‘ऑक्सिजनरेटर’ पुरवण्याचे काम ही रिक्षा करणार आहे. अमेरिकेतील मॅप इंटरनॅशनल या संस्थेने प्रत्येकी ५ लिटर क्षमतेच्या ३० लाख रुपयांच्या १५ ‘ऑक्सिजनरेटर’ची वस्तूरूप मदत जतन फाउंडेशनला दिली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने ही सेवा देण्यात येईल. रिक्षा पंचायतीच्या २५ चालकांंना हे उपकरण हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिन्याला किमान १०० रुग्णांना मदत होईल असा प्रयत्न आहे. दोन पूर्णवेळ कार्यकर्ते संयोजन करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.