ऑक्सिटोसीनयुक्त दुधाने वाढतात हृदयाचे ठाेके! गर्भवतींवरही गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 12:58 PM2022-11-13T12:58:25+5:302022-11-13T12:58:44+5:30

पुणे पाेलिस, अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठवड्यात लाेहगाव परिसरात बेकायदेशीरपणे ऑक्सिटाेसीन हे औषध तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकून ५२ लाखांचा इंजेक्शनचा साठा जप्त केला

Oxytocin milk increases heart rate Serious effects on pregnant women too | ऑक्सिटोसीनयुक्त दुधाने वाढतात हृदयाचे ठाेके! गर्भवतींवरही गंभीर परिणाम

ऑक्सिटोसीनयुक्त दुधाने वाढतात हृदयाचे ठाेके! गर्भवतींवरही गंभीर परिणाम

googlenewsNext

ज्ञानेश्वर भाेंडे

पुणे: गायी किंवा म्हशींना पाणवण्यासाठी (दुधाचा पान्हा फुटण्यासाठी) अनधिकृतपणे दिल्या जाणाऱ्या ऑक्सिटाेसिन इंजेक्शनचा अंश त्यांच्या दुधात उतरताे. असे दूध प्यायल्याने हृदयाची धडधड, पाेटाचे विकार वाढणे आणि स्नायू कमकुवत हाेण्याचा त्रास वाढताे. तसेच गर्भवती महिलांचा अवेळी गर्भपात, गर्भाशय फाटणे असे गंभीर परिणाम हाेत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

पुणे पाेलिस, अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठवड्यात लाेहगाव परिसरात बेकायदेशीरपणे ऑक्सिटाेसीन हे औषध तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकून ५२ लाखांचा इंजेक्शनचा साठा जप्त केला. हे इंजेक्शन ग्रामीण भागात सर्रासपणे गायी व म्हशींना दिले जात असल्याने त्याची चाेरट्या पध्दतीने विक्री हाेत असल्याचे स्प्ष्ट झाले आहे. मात्र, हे इंजेक्शन दिल्याने त्या गायी किंवा म्हशीचे दूध पिणाऱ्या सर्वसामान्यांना त्याचे आराेग्यविषयक दुष्परिणाम भाेगावे लागू शकतात.

अनेक वर्षांपासून या ऑक्सिटाेसिनचा दुरुपयाेग हाेत आहे. ते मेडिकलद्वारा डाॅक्टरांना मिळणे आवश्यक असताना पशुपालकांनादेखील चाेरीछुपे मिळते. ते गायी किंवा म्हशीवर वापरण्यास बंदी आहे. परंतु, ते दुभत्या गायी किंवा म्हशींना दिल्यावर त्या लवकर पानवतात आणि मग त्यांचे दूध काढले जाते. दूधवाढीसाठी तसा त्याचा काेणताही उपयाेग हाेत नसल्याची माहिती पशुवैद्यक तसेच स्त्रीराेगतज्ज्ञ देखील देतात.

म्हणून वापरतात ऑक्सिटाेसिन

खरे पाहता दुभत्या गायी किंवा म्हशीची धार काढतेवेळी त्यांचे वासरू किंवा रेडकू साेडल्यावर त्या नैसर्गिक पद्धतीने पानवतात. मात्र, अनेकदा गायीला गाेऱ्हा (बैल) व म्हशीला टाेणगा (रेडा) झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना फारसा उपयाेग नसताे. अशावेळी ते त्याला एकतर थेट दूध प्यायला साेडले जात नाही. काही वेळा त्याला मारूनही टाकतात. अशा वेळी त्यांना हे इंजेक्शन देऊन कृत्रिमरीत्या पानवले जाते. तर, गायीला कालवड (गाय) झाली किंवा म्हशीला वगार (म्हैस) झाल्यास त्यांना ठेवले जाते व त्यांना थेट दूध प्यायला साेडले जाते. त्यामुळे दुभती गाय किंवा म्हैस पाणवते, अशी माहिती एका पशुपालकाने दिली.

यासाठी असते ऑक्सिटाेसीन

- ऑक्सिटाेसीन हे एक संप्रेरक (हार्माेन) आहे. त्यामुळे गर्भवतीला प्रसूतीदरम्यान कळा येतात किंवा दुधाचा पान्हाही फुटताे. ते महिलांमध्ये उपजतच असते. मात्र, ज्या गर्भवतींना प्रसूतीकळा येत नाहीत, त्यांना स्त्रीराेगतज्ज्ञ किंवा त्यांच्या सल्ल्याने ऑक्सिटाेसीन हे इंजेक्शन दिले जाते. ते दिल्यानंतर त्यांना कळा येतात. तसेच दूध येण्यासाठीही ते वापरले जाते.

असा हाेताे वापर

ऑक्सिटाेसीन औषधाची १०० मिलीची व्हायल १५० रुपयांना मिळते. त्यापैकी दरराेज ५ मिली हे स्वत: पशुपालकच इंजेक्शन त्या गायीला किंवा म्हशीला दूध काढताना देतात. एक व्हायल ही महिनाभर पुरते.

''ऑक्सिटाेसीनचा वापर हे दुभते जनावर पानविण्यासाठी केला जाताे. त्यामुळे दुधात वाढ हाेत नाही. पशुपालकांकडून याचा वापर हाेत असल्याचे दिसून येते. त्याच्यावर बंदी असून, ते पशुपालकांनी वापरू नये. - जयसिंग फुंदे, पशुवैद्यकीय तज्ज्ञ''

''ऑक्सिटाेसीन हे महिलांना बाळंतपणात दिले जाते. ते गायींच्या किंवा म्हशींच्या दुधाद्वारे पिल्यास मानवी शरीरावर त्याचे हृदयाचे ठाेके वाढणे, स्नायू कमकुवत हाेणे, पाेटाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच इतरही परिणाम हाेऊ शकतात. - डाॅ. पराग बिनीवाले, अध्यक्ष, ऑबस्टेट्रिक अँड गायनोकोलॉजिकल सोसायटी, पुणे''

Web Title: Oxytocin milk increases heart rate Serious effects on pregnant women too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.