ओझरच्या गणरायाने शासकीय आरोग्य सेवेतील 'विघ्न' केले दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 04:01 PM2022-12-17T16:01:30+5:302022-12-17T16:03:12+5:30

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी असे केंद्र सुरू करण्यात येईल...

Ozar's Ganaraya removed the 'disruption' in government health care | ओझरच्या गणरायाने शासकीय आरोग्य सेवेतील 'विघ्न' केले दूर

ओझरच्या गणरायाने शासकीय आरोग्य सेवेतील 'विघ्न' केले दूर

Next

- दुर्गेश मोरे

पुणे : सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी, यासाठी राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभागाच्या वतीने (आयईसी) अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे नागरिकांना १३ प्रकारच्या आरोग्य सेवा धार्मिक स्थळी उपलब्ध होणार असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. दरम्यान, हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्वच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी असे केंद्र सुरू करण्यात येईल.

राज्यात असणाऱ्या विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ट्रस्टने स्वत: आरोग्य सेवा सुरू केल्या आहेत. मात्र, त्या अपुऱ्या आहेतच; पण प्रथमदर्शनी ज्या आरोग्य सेवा लोकांना मिळायला हव्यात, त्या अपवाद वगळता कोणत्याही धार्मिक स्थळी पाहायला मिळत नाही. ओझरच्या विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचीही मोफत सुविधा आहे; पण ती अपुरी पडत होती. राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी तत्काळ विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांना आरोग्यवर्धिनी केंद्राची संकल्पना सांगितली. त्यानुसार कवडे यांनीही त्याला सकारात्मकता दर्शवली.

धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यातल्या त्यात अष्टविनायकांपैकी मुख्य स्थान असलेल्या ओझरलादेखील गर्दी जास्त असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाची आरोग्य सेवा पुरविण्यासाठीच या ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी सांगितले. या आरोग्यवर्धिनी केंद्राद्वारे लोकांना १३ प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूती सेवा, नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व आवश्यक आरोग्य सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रोगांची बाह्यरुग्ण सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी, असंसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी, मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी, नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजारासंबंधी सेवा, दंत व मुखरोग आरोग्य सेवा, वाढत्या वयातील आजार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, आयुष व योग आदी सेवांचा यामध्ये समावेश आहे. प्रायोगित तत्त्वावर हे केंद्र ओझरला सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी या केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे ओझरला या केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. ट्रस्टने दाखवलेला पुढाकार देखील महत्त्वाचा असून या केंद्राबरोबर त्या ठिकाणी जेनेरिक मेडिकल देखील सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या केंद्राद्वारे समुपदेशनही करण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासकीय आरोग्य सेवा पोहोचली जाईल.

डॉ. कैलास बाविस्कर

विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य सेवा दिली जाते; पण ती अपुरी पडत आहे. शासनाच्या पुढाकारामुळे आता लोकांना १३ प्रकारच्या आरोग्य सेवा मिळणार आहेत. सध्या ट्रस्टच्या डायलेसिस सेंटरचे काम पूर्णत्वास जात आहे. याशिवाय देवस्थानची जागा उपलब्ध असून त्या ठिकाणी ५० बेडचे रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस असून तशी मागणीही शासनाकडे केली आहे.

गणेश कवडे (अध्यक्ष, विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, ओझर)

Web Title: Ozar's Ganaraya removed the 'disruption' in government health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.