...पी. बी. सावंत यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:12 AM2021-02-16T04:12:53+5:302021-02-16T04:12:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशाच्या राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य करणारे ज्येष्ठ विधिज्ञ, कृतिशील विचारवंत, सामाजिक सुधारणांना वाहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशाच्या राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य करणारे ज्येष्ठ विधिज्ञ, कृतिशील विचारवंत, सामाजिक सुधारणांना वाहून घेतलेलं पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. पद किंवा काम कोणतेही असो या सर्व प्रवासात त्यांनी मूल्यांशी कधीही कुणाशी तडजोड केली नाही. कधी कोणासमोर ते झुकले नाहीत. न्यायव्यवस्था ही अंतिमत: राज्यघटना आणि भारतीय समाजाला बांधील आहे हेच त्यांच्या निकालांमधून दिसले, असा माणूस आणि न्यायमूर्ती पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत विधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी माजी न्यायमूर्ती परशुराम बाबूराव ऊर्फ पी. बी. सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.
---
पी. बी. सावंत यांच्या निधनाने ज्येष्ठ विधिज्ञ, कृतिशील विचारवंत, सामाजिक सुधारणांना वाहून घेतलेलं पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. न्या. सावंत यांचं देशाच्या न्यायदान प्रक्रियेतलं व सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रातलं योगदान कायम स्मरणात राहील. त्यांचे निवाडे कायद्याच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या निवाड्यांकडे न्यायदानाच्या व्यवस्थेतील मैलाचे दगड म्हणून बघितलं जातं. दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांचा आवाज म्हणून ते कार्यरत राहिले. राजकीय, सामाजिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने देशातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीची मोठी हानी आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
-----
काही वर्षांपूर्वी एक लवाद नेमला होता. त्यावर माजी न्यायमूर्ती पी.बी सावंत यांची नियुक्ती झाली होती. मुंबईतले प्रसिद्ध हॉटेल आणि पुण्यातला एक क्लब यांच्यातील तो वाद होता. हॉटेलच्या बाजूने मी वकील म्हणून काम पाहात होतो. पी. बी सावंत हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असल्यामुळे आमच्यावर काहीसा दबाव होता. हे पद इतक मोठं असल्याने त्यांच्यासमोर केस चालवायची आहे. आपल्याला जमणार का? असं दडपण वाटत होतं. पण आम्हा दोन्ही बाजूच्या वकिलांना पी. बी. सावंत यांनी स्वत: फोन केला आणि त्यांच्या घरी चहाला बोलावले. हे लवादाचे काम चांगले कसे करता येईल हे पाहूयात. आम्हाला तो धक्का होता. चर्चेअंती तोडगा निघाला. पी.बी सावंत हे खरंच एक आदर्श न्यायमूर्ती होते.
- ॲड दादासाहेब बेंद्रे, ज्येष्ठ विधिज्ञ
---
पी. बी. सावंत यांनी निकालांमधून राज्यघटनेचे अत्यंत संतुलित विश्लेषण केले. ज्यावेळी सरकार आणि नागरिक यांच्यात काही वाद निर्माण झाले. तेव्हा त्यांनी नागरिकांच्या मुलभूत अधिकारांची जपणूक केली. हे माझ्या दृष्टीने न्यायमूर्तींचे मोठे योगदान असते. त्यांच्या निधनाने न्यायव्यवस्थेची मोठी हानी झाली.
- डॉ. उल्हास बापट, राज्यघटनेचे अभ्यासक
-----
वकील, न्यायाधीश, विविध सरकारी समित्यांचे अध्यक्ष, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व त्यानंतर सुरू केलेल्या सामाजिक कार्यांत त्याच्यातील माणूसपण, निर्णयक्षमता, प्रसंगावधान असे मानवी पैलू कधीच बदलले नाहीत. इंदिरा सहानी, एअर इंडिया, गुजरात दंगल अशा अनेक महत्त्वाच्या खटल्यांचे कामकाज त्यांच्यासमोर चालले. विधीचे शिक्षण पाच वर्षांवरून तीन वर्ष करण्याचे नियोजन सुरू होते. त्यास विरोध करण्यासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा आंदोलन केले. हे आंदोलन मी सावंत यांच्या प्रेरणेतून केले होते. त्यामुळे आजही पाच वर्षांचे विधिचे शिक्षण सुरू आहे. त्यांच्या निधनाने आमच्या ५० वर्षांच्या मैत्रीत आज खंड पडला आहे.
- बी. जी. कोळसे पाटील, निवृत्त न्यायाधीश
----
प्रोग्रेसिव्ह लॉ असोसिएशनचे प्रणेते म्हणून माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्याशी १९९० पासून माझा परिचय होता. त्यानंतर आमच्यात अतिशय जिव्हाळ्याचे नाते तयार झाले. न्यायाधीश म्हणून त्यांनी कायम निस्पृह, नि:पक्ष व कठोर न्यायनिवाडे दिले. त्यांनी राष्ट्रीय व समाजहित कायम डोळ्यांसमोर ठेवून न्याय दिला. त्यामुळेच सर्व घटकांमध्ये त्यांच्याबद्दल अतिशय आदर व्यक्त होत असे. आमच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. मात्र त्यामुळे आमच्यात कधीही कटूता आली नाही. याउलट ते माझे आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने कायद्याच्या क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
- ॲड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधीज्ञ
----
समाज परिवर्तन घेतलेल्या भूमिकांना कोणी विरोध केला तर ते अगदी शांतपणे विरोधकांची भूमिका समजावून घेत. सर्वसामान्यांची मानवी मुल्य वाढवी यासाठी त्यांनी नेहमी विद्धोह केला. त्यांच्या जाण्याने आम्ही एक मोठा मार्गदर्शक गमावल्याचे दु:ख आहे.
- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते
--
इंदिरा साहनी सारखा खटला असो की अन्य खटले, न्यायव्यवस्था ही अंतत: राज्यघटना आणि भारतीय समाजाला बांधील आहे हेच त्यांच्या निकालांमधून दिसले, केवळ न्यायमूर्तीच नाही तर कायद्याचे भाष्यकार, चळवळींचे मार्गदर्शक, धर्मनिरपेक्षता-समता-न्याय-स्वातंत्र्य या घटनात्मक मुल्यांवर अव्यभिचारी निष्ठा असलेले विचारवंत, मार्गदर्शक अशा अनेक भूमिकांमध्ये ते आयुष्याच्या अंतापर्यंत वावरले. त्यांची उणीव सतत भासत राहील.
- विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते