पुलंनी विनोदाला विसंगतीकडून सुसंगतीकडे नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 04:12 PM2018-11-20T16:12:35+5:302018-11-20T16:12:56+5:30
पु.ल.देशपांडे यांनी विनोदाला व्यंगातून अव्यंगाकडे, विसंगतीकडून सुसंगतीकडे नेण्याचे काम केले. समाजातील सगळ्या प्रवाहांशी एकरूप होऊन सर्जनशीलपणे वावरणारे ते व्यक्तिमत्व होते.
पुणे : पु.ल.देशपांडे यांनी विनोदाला व्यंगातून अव्यंगाकडे, विसंगतीकडून सुसंगतीकडे नेण्याचे काम केले. समाजातील सगळ्या प्रवाहांशी एकरूप होऊन सर्जनशीलपणे वावरणारे ते व्यक्तिमत्व होते. त्यांच्या चांगुलपणाला प्रज्ञा- प्रतिभेची जोड होती. मराठी माणसाच्या कलेची आनंदनिधाने त्यांनी जोपासली’, अशी भावना मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केली.
पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आयोजित पुलोतत्सवात ‘देणे पु. लं.चे’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात दिनकर गांगल, रामचंद्र देखणे, प्रा. मिलिंद जोशी, ज्योती सुभाष सहभागी झाले होते. मंगला गोडबोले यांनी मान्यवरांशी संवाद साधला.गांगल म्हणाले, ‘पुलंनी आपली हृदये काबीज केली. पुलंवर महाराष्ट्राने भक्ती केली. त्यांच्यावरही सुरूवातीच्या काही काळात टीका झाली; पण पुलंचा सच्चेपणा नंतर प्रतीत होत गेला. १९७५ च्या दरम्यान पुल आणि महाराष्ट्र एकमेकांशी बांधले गेले. ग्रंथालीच्या गावोगावी होणा-या ग्रंथ प्रदर्शनात पुस्तकं, कॅसेट्स अशा विविध माध्यमांतून पुलंचा सहभाग असायचा. पुलंना माध्यमांची अचूक जाण होती. त्यांच्या चांगुलपणाला प्रज्ञा- प्रतिभेची जोड होती.’
रामचंद्र देखणे म्हणाले, ‘तिशीच्या आत पुलंनी तुकाराम हे नाटक लिहिले. यावरून संत साहित्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी लक्षात येते. पुलंची विविध रूपे आपल्यासमोर येतात; पण मी त्यांच्याकडे एक तत्वज्ञ म्हणून बघतो. व्यंगातून अव्यंगाकडे, विसंगतीकडून सुसंगतीकडे नेण्याचे काम पुलंनी केले. त्या विनोदामागे तत्वज्ञान असते, हे मान्य करावे लागेल. समाजात विकृती आणि चमत्कृती असते. त्यातून निर्माण होणा-या विनोदामागे तत्वज्ञानाचे बीज असते. तत्वज्ञान हे आत्मरक्षा होते.’
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘मराठी साहित्यिक आणि साहित्यविषयक संस्थांमध्ये पुलंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आवाज न चढवता आणि कठोर शब्द न वापरता पुलंनी कायम आपली भूमिका घेतली. मुक्त कंठाने दुस-याची स्तुती करण्यासाठी मनाचा मोठेपणा, दुस-यांच्या कलेकडे पाहण्याची निखळ दृष्टी पुलंनी कला आणि साहित्यविश्वाला दिली. नवलेखकांना ते नेहमीच प्रोत्साहन द्यायचे. ग्रामीण भागातील धडपड्या व्यक्ती आणि संस्थांना ते विविध स्वरूपाच्या माध्यमातून मदत करत होते. समाजातील सगळ्या प्रवाहांशी एकरूप होऊन सर्जनशीलपणे वावरणारे व्यक्तिमत्व होते.’
ज्योती सुभाष म्हणाल्या, ‘पुल नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टसचे संचालक झाले, त्यावेळी त्यांचे कलागुण जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. पुलंची सृजनशीलता प्रत्येक दिशेने जाणारी होती. ते लहान मुलासारखे निष्पाप होते, त्यांच्या कलेमध्ये खूप शुद्धता होती. पुलंनी चांगुलपणाला आधुनिकतेची जोड दिली.’गोडबोले म्हणाल्या, ‘पुल स्वत: च्या अपयशाकडेही मिस्कीलपणे बघायचे. रोजचा दिवस गोड करण्याचे तत्वज्ञान पुलंनी महाराष्ट्राला दिले. आधुनिक तत्वज्ञानाचा चेहरा म्हणजे पुलं. एकाचवेळी लोकल आणि ग्लोबल अशा पातळ्यांवर पोहोचलेले व्यक्तिमत्व होते. मराठी माणसाच्या कलेची आनंदनिधाने त्यांनी जोपासली. पुलंना स्वातंत्र्याचे विलक्षण आकर्षण होते.’ उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.