पी़ एन.गाडगीळ ज्वेलर्सची १ कोटी ६० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:10 AM2021-01-21T04:10:47+5:302021-01-21T04:10:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चंदीगड येथे शाखा उघडण्यासाठी आणि स्वत:ला व्यवसायासाठी ५० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चंदीगड येथे शाखा उघडण्यासाठी आणि स्वत:ला व्यवसायासाठी ५० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून एकाने प्रसिद्ध पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सला १ कोटी ६० लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला आहे.
या प्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ (वय ४२, रा.विजयनगर कॉलनी, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रोहितकुमार शर्मा (वय ५९, रा. दशमेशनगर, पंजाब) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लक्ष्मी रोडवरील पी़ एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या दुकानात ऑक्टोबर, २०१८ ते ४ फेब्रुवारी, २०२१ या दरम्यान घडला आहे.
रोहितकुमार शर्मा हा पी.एन. गाडगीळ ज्वेलर्स येथील कार्यालयात आला. आरोपीने गाडगीळ यांचा विश्वास संपादन केला. पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सचे अधिकारी चंदीगडला गेले होते. त्यावेळी रोहितकुमार शर्मा याने मोठमोठ्या जागा दाखविल्या होत्या. ते पाहिल्यावर त्याच्यावर त्यांचा विश्वास बसला. त्याने स्वत:ला व्यापार करण्यासाठी गाडगीळ यांच्याकडून ५७ लाख ५० हजार रुपये घेतले. चंदीगड येथे त्यांच्या ज्वेलर्सची शाखा उघडून, त्या ठिकाणी फिर्यादी यांना व्यापार करण्यासाठी ५० कोटींचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून कर्ज वितरणासाठी व कर्ज प्रक्रिया शुल्क म्हणून १ कोटी ३ लाख रुपये घेतले. त्यानंतर, कुठल्याही प्रकारे कर्ज मिळवून दिले नाही, तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही. चंदीगड येथे शोरूम सुरू केले नाही. त्यासाठीची दिलेली रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना पैसे परत केले नाही, उलट तेथील राजकीय संबंधाचा वापर करून त्यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे शेवटी गाडगीळ यांनी फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज गुन्हे शाखेकडे केला होता. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी अधिक तपास करीत आहेत.