Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; बुधवारी तब्बल १८०५ जणांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:39 PM2022-01-05T18:39:21+5:302022-01-05T18:40:30+5:30
शहरातील कोरोनाबधितांच्या संख्येत मागील आठ्वड्यापासून लक्षणीय वाढ होताना दिसत आहे
पुणे : शहरातील कोरोनाबधितांच्या संख्येत मागील आठ्वड्यापासून लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कालच रुग्णसंख्येने हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर आज तब्बल १८०५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. बधितांची टक्केवारी थेट १८ टक्क्याच्या वर गेली असून शहरात होणारी रुग्णवाढ चिंताजनक असल्याचे दिसू लागले आहे. तर आज दिवसभरात १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज दिवसभरात १३ हजार ४४३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या दररोजच्या मोठया रुग्ण वाढीमुळे बुधवारी शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ५ हजार ४६४ इतकी झाली आहे. गेल्या दोन दिवसात पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने चाचण्या वाढवल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांमध्येही वाढ होताना दिसून आहे. सध्या विविध रुग्णालयात ७३ गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज पुण्यात एकाही मृत्यूची नोंद नाही.
आतापर्यंत ५ लाख १४ हजार ४९४ जण बाधित आढळून आले आहेत. यातील ४ लाख ९९ हजार ९११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार ११९ जण दगावले आहेत.