जुन्नर तालुक्यातील पाचकेवस्ती अनेक सुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:35+5:302021-05-10T04:11:35+5:30
जगाच्या कानाकोपऱ्यात रस्त्यांचे जाळे पसरलेले असताना उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावरील डोंगराळ, दुर्गम आदिवासी पट्ट्यात अद्यापपर्यंत रस्तेच तयार करण्यात आले ...
जगाच्या कानाकोपऱ्यात रस्त्यांचे जाळे पसरलेले असताना उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावरील डोंगराळ, दुर्गम आदिवासी पट्ट्यात अद्यापपर्यंत रस्तेच तयार करण्यात आले नाहीत. येथील नागरिकांना स्वातंत्र्योत्तर काळापासून जा-ये करण्यासाठी रस्ताच नाही. नाईलाजाने या वस्तीतील रहिवाशांना सर्वच ऋतूंमध्ये पायपीट करीत अगदीच कसरत करावी लागते. पायवाटेचा वापर करुन फिरावे लागत आहे. तर त्यांना रस्ताच नसल्यामुळे अद्यापपर्यंत विकासकामांपासून व नागरी सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
.
जुन्नर तालुक्यातील तळेरान हद्दीतील सुमारे ३० घरांच्या पाचकेवस्तीला अद्यापही जायला यायला रस्ताच नाही. तळेरानच्या प्रमुख रस्त्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतर पायवाटेने कसरतच करुनच ये जा करावी लागते. येथे प्रशस्त रस्ता मिळत नसल्यामुळे दैनंदिन सर्व व्यवहार पायवाटेनेच करावे लागतात. दूधदुभते, बाजारहाट वाहतूक, खते, बी बियाणे, शेतमाल वाहतूक डोक्यावर वाहूनच करावी लागते तर शाळकरी विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यात पावसाचा धारा डोईवर झेलत व पायाने चिखल तुडवत भर पावसात याच पायवाटेने धोकादायकपणे जा-ये करावी लागते. रस्त्याअभावी या वस्तीवर कोणतेही वाहन पोहोचू शकत नसल्यामुळे येथील नागरिकांना दररोज नवनवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजारी वृध्द व्यक्तीला आजही झोळी करून तीन किलोमीटरपर्यंत पायपीट करून उपचारासाठी न्यावे लागत आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे कालावधीत येथील रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यात न्यायला रस्ताच नसल्यामुळे उपचाराअभावी मरणयातना सहन करण्याची पाळी आता येथील नागरिकांवर आली आहे.
सदर पाचकेवस्तीला अद्याप कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही. हा जुन्नर तालुक्याचा एक अविभाज्य भाग आहे याची कल्पना देखील काही अधिकाऱ्यांना नसावी म्हणून की काय पण येथे शासकीय सोयीसुविधांसोबतच अनेक योजनांचाही अभाव असल्याचे नागरिक सांगत आहेत. खाचखळगे आणि पायवाटचे जणू आमच्या पाचवीलाच पूजन झाल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. उन्हाळ्यात या भागात पिण्याच्या पाण्याचे देखील दुर्भिक्ष असते. रस्ताच नाही तर टँकर मागायचा कसा? असा प्रश्न उपस्थित होतो. शिवकालीन टाक्यांमध्ये साठलेल्या पाण्यावर तहान भागवावी लागते व तेथील पाणी उन्हाळ्यात संपुष्टात आले की, एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीवरून पिण्याचे पाणी विनंती करून मागावे लागते. अशी गंभीर अवस्था पिण्याच्या पाण्याची असूनही दररोज मरणयातना सोसत जीवन जगताना येथील प्रचंड प्रमाणात नित्य उद्भवणाऱ्या समस्यांकडे अद्आपही कोणीच लक्ष देत नसल्याचे पोपट कोकाटे, काशीनाथ कोकाटे, रुपाजी कोकाटे, ज्ञानेश्वर कोकाटे, विलास पाटील कोकाटे शंतनु जोशी यांनी सांगितले.
तळेरान (ता. जुन्नर) पाचकेवस्ती घरे रस्ते