पाडाला पिकला आंबा, घाटावरील आंबा यावर्षी लवकर लागला पाडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:52+5:302021-05-11T04:09:52+5:30
कोकणातील हवामान व घाटावरचे हवामान यामुळे दर वर्षी कोकणातील आंबा संपल्यावर घाटावरचा आंबा सुरू होतो. त्यात मे अखेर व ...
कोकणातील हवामान व घाटावरचे हवामान यामुळे दर वर्षी कोकणातील आंबा संपल्यावर घाटावरचा आंबा सुरू होतो. त्यात मे अखेर व जूनच्या पहिल्या आठवड्यात पडणाऱ्या वळवाच्या पावसामुळे या आंब्याचे मोठे नुकसान होते. त्यातूनही उरलेल्या आंब्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आंबेगाव, जुन्नर या भागातील आंब्याला रंग, चव असूनही दुर्लक्षित राहिला आहे.
मात्र, यावर्षी मेच्या पहिल्याच आठवड्यात हा आंबा पिकू लागला आहे. जुनच्या दुसऱ्या आठवड्यात पिकणारा आंबा मेच्या पहिल्याच आठवड्यात पिकू लागल्याने अनेक शेतकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. यावर्षी थंडी व गरमी यातील चढ-उतारामुळे एका झाडाला तीन ते चार वेळा मोहोर आले. तसेच अधूनमधून पडणारा पाऊस याचाही परिणाम झाडांवर झाला. तसेच मागील वर्षी ३ जून रोजी झालेल्या चक्रीवादळामुळेही झाडांमध्ये बदल होऊन त्यांनी लवकर आंबा पिकायला घातला असल्याचे शेतीतज्ज्ञ संतोष सहाणे यांनी सांगितले.
यावर्षी लवकर आंबा पिकू लागल्याने कोकणातील देवगड व रत्नागिरीसारखाच आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आंब्याला भाव मिळेल अशी आशा वाटते. आंबा पाडाला लागल्याने काढून आढी लावायला सुरुवात केली असून लवकरच आमचा आंबा मुंबईच्या बाजारपेठेत जाईल असे येणेरे येथी आंबा उत्पादक शेतकरी रामभाऊ ढोले यांनी सांगितले.
आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आंबा विकत घेणारे सतीश बेंडे यांनी मंचर येथे शिवगिरी मंगल कार्यालयात आंबा खरेदी सुरू केली असून ३०० ग्रॅमच्या वरील आंब्यास ४०० रुपये, २७५ ग्रॅमच्या वरील आंब्यास ३५०, २५० ग्रॅमच्यावरील आंब्यास ३०० रुपये, २२५ ग्रॅमच्या वरील आंब्यास २०० रुपये, २०० ग्रॅमच्या वरील आंब्यास २०० रुपये भाव काढला आहे.
घाटावरचा आंबासुद्धा देवगड, रत्नागिरीच्या तोडीस तोड आहे. याचा रंग व चव कोकणातील आंब्यापेक्षा भारी आहे. जुन्नर, आंबेगावमध्ये पिकणाऱ्या हापूस आंब्याला सन्मान देण्यासाठी शिवनेरी हापूस म्हणून मानांकन द्यावे ही मागणी आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून आहे, यावर शासनाने विचार करावा अशी मागणी घोडेगाव येथील आंबा उत्पादक शेतकरी नितीन काळे यांनी केली.
10052021-ॅँङ्म-ि03, 04 - झाडावर पिकलेला आंबा
10052021-ॅँङ्म-ि05 - आंबे उतरवताना शेतकरी