पुणे जिल्ह्यात यंदा ९३ टक्के क्षेत्रावर भात लागवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:31+5:302021-08-14T04:14:31+5:30

कांताराम भवारी डिंभे : भात उत्पादनाचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ५७ हजार ९६४ हेक्टर भात क्षेत्रापैकी ...

Paddy is cultivated on 93% area in Pune district this year | पुणे जिल्ह्यात यंदा ९३ टक्के क्षेत्रावर भात लागवडी

पुणे जिल्ह्यात यंदा ९३ टक्के क्षेत्रावर भात लागवडी

Next

कांताराम भवारी

डिंभे : भात उत्पादनाचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील एकूण ५७ हजार ९६४ हेक्टर भात क्षेत्रापैकी ५४ हजार १०१ हेक्टर क्षेत्रावर भात लागवडी पूर्ण झाल्या आहेत. भात लागवडीसाठी जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिली असली तरी यंदा भात लागवडीची कामे वेळेत उरकली आहेत. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ९३ टक्के भात क्षेत्रावर लागवडी पूर्ण झाल्या आहेत. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसला असून, उरल्यासुरल्या भातशेतीवर यंदा शेतकऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाच्या अनियमिततेचा फटका भातशेतीला बसत असून, याचा परिणाम भात उत्पादनावर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, हवेली व पुरंदर या तालुक्यात ५७ हजार ९६४ एवढे एकूण भातक्षेत्र आहे. जिह्यातील प्रामुख्याने सह्याद्रीच्या पर्वत रांगात राहणाऱ्या शेतकऱ्यांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती केली जाते. या भागातील भात उत्पादनाचे क्षेत्र हे प्रामुख्याने जिरायती क्षेत्र म्हणून ओळखले जात असल्याने भातशेतीसाठी या भागातील शेतकऱ्यांना पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलबून रहावे लागते. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांचा विचार करता खरीप हंगामाच्या अनेक टप्प्यांवर भातशेती संकटात सापडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. दिवसेंदिवस पावसाच्या लहरीपणाचा फटका भातशेतीला बसू लागला असून हजारो लोकसंख्येच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाणारी भातशेती निसर्गाच्या अवकृपेमुळे मोडीत निघू लागली आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळसी व हवेली या भागामध्ये आंबेमोहर, इंद्रायणी, जीर, रायभोग, बासमती यांसारख्या अस्सल पारंपरिक व गरव्या जातीच्या भाताचे उत्पादन घेतले जाते.

यंदाच्या हंगामात कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार

तालुका एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये झालेली लागवड हेक्टरमध्ये

जुन्नर १० हजार ८०० १० हजार ८००

आंबेगाव ५ हजार १३७ ४ हजार ८२१

खेड ७ हजार ७५० ६ हजार ६१०

हवेली १ हजार ९३५.६ २ हजार ९५४

मुळशी ७ हजार ७००.०३ ६ हजार ४५५.५

भोर ७ हजार १४३.४ ७ हजार ४८०

मावळ ११ हजार ५५० १० हजार १२१

वेल्हे ४ हजार ९३४.६ ४ हजार ७१७.३५

पुरंदर १ हजार १२.६ १ हजार १४१.७५

आजअखेर भातशेतीचे क्षेत्र असणाऱ्या तालुक्यांत पावसाचे प्रमाण

तालुका जून जुलै ऑगस्ट एकूण

भोर २७० मिमी ५०५ मिमी ६५ मिमी ८४० मिमी

वेल्हे ४५६ मिमी ७६५ मिमी ७७ मिमी १२९८ मिमी

मुळशी ३१४ मिमी ७५० मिमी ६९ मिमी ११३३ मिमी

मावळ ३३८ मिमी ८७६ मिमी १०५ मिमी १३९९ मिमी

हवेली १५३ मिमी १४९ मिमी ९ मिमी ३११ मिमी

खेड १८४ मिमी २२० मिमी २१ मिमी ४२५ मिमी

आंबेगांव २०६ मिमी २८१ मिमी ३८ मिमी ५२४ मिमी

जुन्नर १२८ मिमी १८९ मिमी १५ मिमी ३३१ मिमी

यंदा जिल्ह्यात एकूण असणाऱ्या भात उत्पादक क्षेत्रापैकी सुमारे ९३ टक्के भातलागवडी झाल्या आहेत. जून महिन्यात पावसाचा खंड पडला. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. याचा परिणाम भात उत्पादनावर होणार आहे. भातशेतीनंतर शेतकऱ्यांना वाल, पावटा, घेवडा यांसारखी पिके घेण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत.

-डी. बी. बोटे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, पुणे

यंदा सुरुवारीला पावसाने चांगली साथ दिल्याने आमच्या भागातील शेकऱ्यांनी भात लागवडी लवकर सुरू केल्या होत्या. मात्र, जून महिन्यात पावसाने फसविले. जुलैला दारकोंड पाऊस झाल्याने लागवड केलेली भातशेती आणि ताली वाहून भातशेतीचे नुकसान झाले. आता उरल्यासुरल्या शेतीवर समाधान मानावे लागणार आहे.

-संजय आसवले, शेतकरी, आहुपे

१३ डिंभे

Web Title: Paddy is cultivated on 93% area in Pune district this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.