खेड, आंबेगाव व जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात भातलावणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:01+5:302021-07-07T04:13:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात पावसाने दडी दिली असली तरी जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात पावसाने दडी दिली असली तरी जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील भात खाचरांमध्ये पाणी आलेल्या व पाण्याची सोय असलेल्या शेतक-यांनी मोटारी लावून भात शेतीत पाणी घेऊन भातलावणीला सुरुवात केली आहे. पण पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास हे सर्व भात उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या सहा तालुक्यांत प्रामुख्याने भात लागवड केली जाते. जून महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या चांगल्या पावसानंतर भाताची रोपे टाकण्यात आली. त्यानंतर अधूनमधून येणा-या पावसाच्या सरीमुळे खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात भात रोपाची चांगली वाढ झाली. त्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या चांगल्या पावसाने भात खाचरामध्ये चांगले पाणी देखील आले. यामुळेच चांगले भात पीक येण्याच्या उद्दिष्टाने पाण्याची सोय झालेल्या शेतक-यांनी भातलावणीला सुरुवात देखील केली आहे. तर काही शेतक-यांनी विहिरी, नदी अथवा ओढ्यामध्ये मोटार टाकून भात खाचरांमध्ये पाणी घेऊन भातलावणी उरकली आहे. पण आता गेल्या चार -पाच दिवसांत पावसाने पूर्णपणे दडी दिली असून कडक ऊन पडत आहे. हे वातावरण पुढील एक-दोन दिवस असेच राहिल्यास सर्वच भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
-----
पाऊस लांबल्यास शेतकरी अडचणीत
गेल्या आठ दिवसांत आमच्या आंबोली गावात भात खाचरांमध्ये पाणी आलेल्या व ज्यांना ज्यांना पाण्याची सोय उपलब्ध आहे अशा सर्व शेतक-यांनी भाताची आवणी जवळपास उरकून घेतली आहे. पण आता आणखी काही दिवस पाऊस लांबला तर हे सर्व शेतकरी अडचणीत येतील.
- सुदाम शिंदे (पाटील), शेतकरी आंबोली, खेड