‘अभियंते’ करतायत खेड्यात भातशेती
By admin | Published: March 7, 2016 02:09 AM2016-03-07T02:09:22+5:302016-03-07T02:09:22+5:30
इंजिनिअरिंगची पदवी... एअरकंडिशनमध्ये बसून संगणकावरील काम आणि महिन्याकाठी मिळणारा भरपूर पैसा... हे सर्व सुख पायावर लोळण घेत असताना ते दोघे मात्र कोकणातल्या
सायली जोशी-पटवर्धन, पुणे
इंजिनिअरिंगची पदवी... एअरकंडिशनमध्ये बसून संगणकावरील काम आणि महिन्याकाठी मिळणारा भरपूर पैसा... हे सर्व सुख पायावर लोळण घेत असताना ते दोघे मात्र कोकणातल्या छोट्याशा खेड्यात राहून भातशेती करतायत... गरज एवढीच त्यांची ‘भूक’.... आजच्या काळात ही गोष्ट काहीशी अशक्यच... तरीही विक्रांत आणि मोहिनी पाटील या दांपत्याने ती वास्तवात उतरवून तरुणांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
विक्रांत यांनी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात, तर मोहिनी यांनी औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयात अभियांत्रिकीची पदवी घेतली. बंगळुरूसारख्या महानगरातील नामांकित कंपनीत सॉफ्टवेअरमध्ये काम केले. मात्र, आता त्यांनी दापोली येथील कुडावळे या कोकणातल्या छोट्या गावात राहून भातशेती करण्याचा निर्णय घेतला. नुसता निर्णय घेऊनच ते थांबले नाहीत तर प्रत्यक्ष खाचरात, चिखलात पाय तुडवत डोक्यावर उन्हाच्या झळा सोसत त्यांनी भातशेतीचा वसा घेतला आहे.