भात उत्पादकांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे

By Admin | Published: June 1, 2017 01:38 AM2017-06-01T01:38:12+5:302017-06-01T01:38:12+5:30

भात हे असे पीक आहे, की लावणीपासून ते काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राद्वारे करता येतात व यासाठीची सर्व यंत्रे सध्या उपलब्ध

Paddy farmers should turn to mechanical engineering | भात उत्पादकांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे

भात उत्पादकांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : भात हे असे पीक आहे, की लावणीपासून ते काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राद्वारे करता येतात व यासाठीची सर्व यंत्रे सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे भातउत्पादक शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे, असे प्रतिपादन प्रकल्प संचालक (आत्मा) सुनील बोरकर यांनी केले.
मौजे नाटंबी (ता. भोर) कृषी विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र बारामती व गी. एस. टी टिलर्स ट्रॅक्टर्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याबाबतचे प्रशिक्षण आयोजिण्यात आले होते. त्या वेळी बोरकर बोलत होते.
या वेळी सभापती मंगल बोडके, उपसभापती लहू शेलार, दमयंती जाधव, उपप्रकल्प संचालक अनिल देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, उमेश शर्मा, प्रदीप औताडे, श्रीधर चिंचकर, जी. सी. नेवरे, लक्ष्मीकांत कणसे, ज्योती भोसले, रोहिदास चव्हाण, बी. ए. कांबळे व शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी भोर तालुक्यात मागील तीन वर्षांत यांत्रिक पद्धतीने राबवलेल्या भात लागवडीची माहिती दिली. भात लावणी यंत्रांसाठी ९४ हजार रुपये अनुदान असून, आज अखेर ५ शेतकऱ्यांनी भात लावणी यंत्राची तर कापणी यंत्र, पॉवर टिलर रोटावेटर इत्यादीसाठी ८२ शेतकऱ्यांनी मागणी केल्याचे सांगितले.
उपप्रकल्प संचालक अनिल देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांना शेतीमध्ये असलेली यांत्रिकीकरणाची गरज व आत्माअंतर्गत सन २०१७/१८ मध्ये राबविण्यात येणाऱ्या यांत्रिकी भात लागवड प्रात्यक्षिकाबाबत माहिती दिली. तसेच यावर्षी नाटंबी, तांभाड, आळंदे येथील २५ एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे भात लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी रोपवाटिका वेगळ्या पद्धतीने तयार करणे गरजेचे असून, गादी वाफ्यावर २१ बाय ४८ सेंमी साचे वापरून चाळलेल्या मातीत रोपे तयार करणे गरजेचे आहे, याचे मार्गदर्शन केले. उपसभापती लहू शेलार म्हणाले, सध्याच्या काळात मजुरांअभावी शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे यांत्रिक पद्धतीने शेती करावी. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा.

Web Title: Paddy farmers should turn to mechanical engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.