पादीरवाडी झाली टँकरमुक्त

By Admin | Published: January 26, 2016 01:41 AM2016-01-26T01:41:38+5:302016-01-26T01:41:38+5:30

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जलयुक्त शिवार योजना व लोकसहभाग यांमुळे वडगाव आनंद येथील पादीरवाडी या अवर्षणप्रवण शिवारात जुन्या

Padirwadi became tanker-free | पादीरवाडी झाली टँकरमुक्त

पादीरवाडी झाली टँकरमुक्त

googlenewsNext

आळेफाटा : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जलयुक्त शिवार योजना व लोकसहभाग यांमुळे वडगाव आनंद येथील पादीरवाडी या अवर्षणप्रवण शिवारात जुन्या ओढ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. या ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांत पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचे पाणी जलवाहिनीद्वारे आणल्याने येथील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. यामुळे एके काळी अवर्षणप्रवण असणारी पादीरवाडी टँकरमुक्त झाली आहे. जवळपास १,८०० एकर जमीन सिंचनाखाली अली असून, या पाण्याच्या जोरावर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याकडे गावाची वाटचाल सुरू झाली आहे.
केंद्र सरकारच्या एकात्मिक पाणलोट कार्यक्रमांतर्गत जुन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील अवर्षणप्रवण गावांचा समावेश करण्यात आला. याअंतर्गत विकासाच्या दृष्टीने मागासलेल्या, सतत उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट गडद होणाऱ्या व साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या पादीरवाडी या गावाची दोन वर्षांपूर्वी निवड करण्यात आली.
पाणलोट समिती वडगाव आनंदच्या अध्यक्षा वैशाली देवकर, सदस्य डी. बी. वाळुंज, सचिव वैशाली देवकर, सुरेश शिंदे, नाथा पादीर यांनी पादीरवाडी ग्रामस्थांना या कार्यक्रमाची माहिती देऊन त्याचे महत्त्व पटविले. लोकवर्गणी प्रेरक प्रवेश उपक्रमांतर्गत पाणलोट निधी यांमुळे या परिसरातील बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. जलवाहिनीद्वारे कालव्यातील पाणी या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. या पाण्यामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे.
ही कामे करताना पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या समस्या वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी तसेच ही कामे मार्गी लागावीत, यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, लताताई चौगुले, उपसरपंच सिद्धार्थ गडगे, विघ्नहरचे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे, सामाजिक कार्यकर्ते अनंत चौगुले, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मगर, तालुका
कृषी अधिकारी हिरामणी शेवाळे, यांत्रिकी अभियंता कांबळे यांनी
प्रयत्न केले. (वार्ताहर)
जलयुक्त शिवार योजनेतही या परिसराचा समावेश करण्यात आला. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या भागातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला गती दिली. अवर्षणप्रवण परिस्थितीवर मात करण्यासाठी जुन्या ओढ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय झाला. तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांना उमेदीने सुरवात झाली. जलसंपदा विभागाची मशिनरी कृषी, महसूल व छोटे पाटबंधारे विभाग आणि लोकसहभाग यांतून पादीरवाडीच्या या ओढ्यांवर जवळपास ६० बंधारे निर्माण झाले. शेतकरी बचत गट, शेतकरी समूह यांच्या पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून आणण्यात आलेल्या जलवाहिनीद्वारे हे बंधारे भरण्यात आले.

Web Title: Padirwadi became tanker-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.