तिच्या आरोग्यासाठी झटणारा पुण्यातला पॅडमॅन !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 09:06 PM2018-12-19T21:06:57+5:302018-12-19T21:07:56+5:30

गरीब स्त्रियांना फक्त कपडे देऊन त्यांचे राहणीमान सुधारण्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन देऊन त्यांना ते वापरण्याचे आरोग्यभान देण्याचे काम करतोय पुण्यातला तरुण पॅडमॅन अर्थात सचिन आशा सुभाष.

Padman in Pune who is work for women health! | तिच्या आरोग्यासाठी झटणारा पुण्यातला पॅडमॅन !

तिच्या आरोग्यासाठी झटणारा पुण्यातला पॅडमॅन !

Next

पुणे : भारतीय स्त्रियांचे आरोग्य सुधारायला हवे, त्यांना प्रजनन संस्थेचे आजार होण्यापासून वेळीच रोखणे गरजेचे आहे असे अनेक विचार मांडण्यात येत असले तरी प्रत्यक्षात कृती होत नाही तोवर यात बदल होणे अशक्य आहे. गरीब स्त्रियांना फक्त कपडे देऊन त्यांचे राहणीमान सुधारण्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन देऊन त्यांना ते वापरण्याचे आरोग्यभान देण्याचे काम करतोय पुण्यातला तरुण पॅडमॅन अर्थात सचिन आशा सुभाष. 
                मूळ सोलापूरचा असलेल्या सचिनला लहानपणापासून समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. पण मोठं होऊ मग पैसे मिळवू आणि मग समाजसेवा करू असा विचारही त्याच्या मनात आला नाही. अगदी महाविद्यालयात असताना त्यांनी संपूर्ण राज्यात गाजलेल्या माणुसकीची भिंत हा उपक्रम पहिल्यांदा राबवला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून बघितले नाही. आज त्याच्या समाजबंध संस्थेच्यामार्फत त्याचे अनेक उपक्रम सुरु आहेत.

                 याचाच एक भाग म्हणून पुण्याजवळील भोर- वेल्हा भागातील महिलांना संस्थेमार्फत कपड्यांचे वाटप सुरु असताना त्यांना त्यांच्या मासिक पाळीच्या समस्येविषयी समजले. त्याचा सविस्तर अभ्यास केल्यावर या महिला वापरत असलेल्या सॅनिटरी नॅपकिन म्हणून वापरत असलेल्या पॅडविषयी समजले आणि तो हादरलाच ! अक्षरशः फरशी पुसण्याच्या किंवा पायपुसणी म्हणून वापरायच्या कापडापेक्षाही निकृष्ट दर्जाचा कपडा महिला सॅनिटरी नॅपकिन म्हणून वापरताना त्याला आढळल्या. या प्रश्नावर सचिन आणि त्याची टीम रिसर्च करत होती आणि अचानक त्यांना प्रकाशाचा किरण सापडला. त्यांच्याकडे कपडे वाटण्यासाठी येत असल्यामुळे त्यांनीच पर्यावरण पूरक सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा विचार केला आणि तयार झाले 'आशा पॅड'. 
              काही डॉक्टर, तज्ज्ञ यांची मदत घेऊन समाजबंधतर्फे आशा पॅड बनवणे सुरु झाले आहे. हे पॅड बनवण्यापेक्षा महिलांना त्याच्या वापरासाठी तयार करणे अधिक अवघड असते. पण सचिन आणि त्याची टीम यात पूर्ण निपुण झाली असून महिलांना ते अतिशय सहजपणे आशा पॅड वापरण्यास उद्युक्त करतात.आजपर्यंत सुमारे दोन हजार महिलांनी आशा पॅडचा वापर केला आहे. 

                 या प्रकल्पाबद्दल सचिन सांगतो, 'कोणत्याही प्रकारचे पैसे कमावण्याचा हेतू नसल्यामुळे आम्ही विनामूल्य आशा पॅडचे वाटप करतो. मासिक पाळीबद्दल केवळ ग्रामीण नाही तर शहरी स्त्रियांमध्येही अंधश्रद्धा आहे. या काळात आरोग्याची झालेली हेळसांड आयुष्यभराच्या आजारांना आमंत्रण देणारी असते. त्यामुळे अधिकाधिक स्त्रियांमध्ये याबाबतची जनजागृती करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व स्त्रियांना कायमस्वरूपी पॅड वाटणे अशक्य असून या माध्यमातून त्यांच्यात मासिक पाळीच्या काळात काळजी  घेण्याची जाणीव तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत'.
आज समाजबंधच्या माध्यमातून इतर महिलांना आणि संस्थांनाही पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. घरातली बाई, आई आणि ताई यांच्या पलीकडे जात आजूबाजूला वावरणाऱ्या आणि कोणतीही ओळख, नातं नसणाऱ्या 'तिच्या' आरोग्याची काळजी वाहणारा सचिन पुण्याचा आधुनिक पॅडमॅन आहे यात शंका नाही.

Web Title: Padman in Pune who is work for women health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.