पाबळ येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले पद्मणी जैन मंदिर दर्शनासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 04:12 PM2020-03-17T16:12:37+5:302020-03-17T18:42:24+5:30
शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद
शिक्रापूर : पाबळ (ता . शिरूर) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री पद्ममणी जैन मंदिर येथील दर्शन भाविकांसाठी मंगळवारी (दि. १७) पासून बंद करण्यात आले आहे. सध्या जागतिक पातळीवर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणू प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेत श्री पद्ममणी जैन तीर्थ पिढी यांनी हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशातून पाबळ येथे येणाऱ्या सर्व भाविकांना पाबळला न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत दर्शनासाठी येऊ नये. हजारो भाविक पाबळ येथे शनिवार-रविवारसह त्याचबरोबर दररोज जैन मंदिर येथे दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्राबरोबरच गुजरात मध्य प्रदेश व संपूर्ण देशातूनच याठिकाणी जैन भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात पुणे-मुंबई त्याचबरोबर नाशिक औरंगाबाद याठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर भाविक देवदर्शनासाठी पाबळ येथे येत असतात. त्याचबरोबर मुख्यता गुजरात व अन्य भागातून मोठ्या प्रमाणावर जैन भावी पाबळ येथे दररोज दर्शनासाठी येत असतात .येथील ट्रस्टने आज १७ मार्चपासून मंदिरातील दर्शन बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी बंद केले असून नुकतेच मंदिराचे संपूर्णपणे निजंर्तुकीकरण करण्यात आले. त्याचबरोबर येथे असलेले भोजनशाळा , धर्मशाळा देखील निजंर्तुकीकरण करून शासनाच्या पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे ठरवले आहे. याबाबत लांबून येणाऱ्या भाविकांनी देखील पाबळ येथे न येण्याचे आव्हान पद्मनी जैन श्वेताम्बर तीर्थ पिढीचे अध्यक्ष भरत नागोरी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे .यादरम्यान येथील भोजन शाळा व धर्मशाळा बंद राहणार असून फक्त नित्यनियमाने होणारी पूजा-अर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.