‘भामचंद्र’वर तळीरामांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:59 AM2018-10-05T01:59:15+5:302018-10-05T01:59:49+5:30
कारवाईची मागणी : आध्यात्मिक वारशाला लागतेय गालबोट
आंबेठाण : जगदगुरू संतशिरोमणी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भामचंद्र डोंगर हा तळीरामांचा अड्डा बनला असून या ठिकाणी दारू पार्ट्या रंगू लागल्या आहेत. भामचंद्र डोंगर एक आध्यात्मिक वारसा लाभलेला परिसर आहे. या ठिकाणी स्वच्छ हवा, व्यायाम, अभ्यास, रोज सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी, शांत, मन रमविण्यासाठी दररोज अनेक नागरिक येत असतात.
संत तुकाराम महाराजांना या ठिकाणी परमेश्वराचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे माऊलींची लेकरं आध्यात्मिक अभ्यासासाठी येथे येत असतात. वारकरी संप्रदायाचे दोघे जण गेली अनेक वर्षे येथे राहत आहे. औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये डोंगराच्या पायथ्याचा भाग येतो. या परिसरात वाहनांची व नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. डोंगराच्या पायथ्याच्या गर्द झाडीत सहसा कोणी जास्त जात नसल्याचा फायदा तळीरामांनी घेतला आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत इकडे कोणी फिरकत नाही. त्यामुळे तळीरामांचा अड्डा बनल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. दारू व पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास तसेच जेवणाचे पेपर दिसून येत आहेत.