‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 11:09 IST2025-04-24T10:53:54+5:302025-04-24T11:09:34+5:30
सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजाण म्हंटल पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं.

‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. २२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश होता. या घटनेमुळे पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रात शोक व संतापाची भावना पसरली आहे.
आज पहाटे या दोघांचे पार्थिव त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आले. परिसरातील नागरिकांनी अश्रूंसह त्यांना अंतिम निरोप दिला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले.
यावेळी कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने अंगावर शहारा आणणारा अनुभव शरद पवारांना सांगितला. त्या म्हणाल्या, 'त्यातल्या एकाने बोलावून घेतलं आणि म्हणाला अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ? त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या. आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजाण म्हंटल पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं.
त्या पुढे म्हणाल्या,'तिथे गेटवर एक मुस्लिम होता, तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुक केली आहे ? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आमच्या घोड्यावाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर घ्यायला आले. आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली, सैन्य दलाची देखील मदत मिळाली पण तोपर्यंत उशिरा झाला होता आमची माणसं गेली होती.
ही सगळी घटना सांगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. या हल्ल्यात त्यांनी पतीला गमावले, पण स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी प्रसंगावधान राखून निर्णय घेतल्याची जाणीव झाली. शरद पवारांनी त्यांच्या भावना शांतपणे ऐकून घेतल्या आणि या घटनेचा निषेध करत केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. दहशतवाद्यांच्या अशा हल्ल्यांनी देशभरातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, केंद्र सरकारने तत्काळ कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.