हंडाभर पाण्यासाठी पायपीट
By admin | Published: March 25, 2017 03:42 AM2017-03-25T03:42:16+5:302017-03-25T03:42:16+5:30
बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. घरोघरी नळजोड असूनदेखील पाणी येत नाही.
काऱ्हाटी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. घरोघरी नळजोड असूनदेखील पाणी येत नाही. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करूनदेखील पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. विकत पाणी घेऊन तहान भागविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
तालुक्यातील माळवाडी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव क.प., रसाळवाडी, देऊळगाव रसाळ, काऱ्हाटी परिसरात याही वर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मोरगाव प्रादेशिक योजनेतून पाणी चार-चार दिवस येत नाही. शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी तीन-चार किलोमीटर अंतरावर जावे लागते. एकीकडे ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचा तगाता लावला आहे. वर्षाकाठी १००० रुपये पाणीपट्टी आकारली जात असताना दररोज पाणी मिळणे गरजेचे होते. मात्र, काऱ्हाटीसारख्या मोठ्या गावात जास्त लोकसंख्येच्या तुलनेत पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र, सहा ते आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुन्हा विकत घेण्याची वेळ आली आहे. वाड्यावस्त्यांवरील बहुतांश भागातील विहिरींचा तळ उघडा पडला आहे. उपलब्ध पाणी क्षारयुक्त आहे.