पायी वारीला मुकलो; घरी थांबूनच मानसिक वारी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:19+5:302021-07-07T04:13:19+5:30
पुणे : जगाला समतेचा संदेश देणारा सोहळा म्हणजेच आषाढीची पायी वारी होय. कोरोनाच्या महामारीने मागील वर्षी पालखी सोहळा होऊ ...
पुणे : जगाला समतेचा संदेश देणारा सोहळा म्हणजेच आषाढीची पायी वारी होय. कोरोनाच्या महामारीने मागील वर्षी पालखी सोहळा होऊ शकला नाही. पण यंदा वारीचा आनंद घेता येईल. या आशेत सर्व वारकरी होते. पण यंदाही तो आनंद घेता येणार नाही. पालखी सोहळ्याच्या पायी वारीला मुकलो तरी घरी थांबूनच मानसिक वारी करणार असल्याची भावना युवा कीर्तनकारांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात दरवर्षी जुलै महिन्यात ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात पालखी सोहळा सुरु होतो. राज्यातून प्रमुख संतांच्या दहा पालख्या विठ्ठलाच्या भेटीस जात असतात. लाखोंच्या संख्येने वारकरी या पायी वारी सोहळ्यात सहभागी होतात. दोन वर्षांत वारकरी आणि कीर्तनकारांना या सोहळ्यापासून मुकावे लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर युवा कीर्तनकारांनी ही नवी संकल्पना अस्तित्वात आणली.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव यांच्याबरोबरच अनेक संतांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. गाव, शहरात मुक्काम करत सर्व पालख्या आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला जातात. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने मानसिक वारीची संकल्पना जाणून घेण्यासाठी युवा कीर्तनकारांशी संवाद साधला.
ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे म्हणाले की, पायी वारी अशक्य असली तरी मानसिक वारीचे चिंतन शक्य आहे. महामारीच्या प्रतिबंधामुळे मनस्वी वारीचा संकल्प कीर्तनकारांनी सुरू केला आहे. त्यात पांडुरंगाच्या सेवेचा संकल्प, संत विचारांची जोपासना, हरिनामाचा अखंड उच्चार आणि दुःखित, पीडित लोकांची यथाशक्य सेवा हा मानसिक वारी करण्याचा त्यांचा मानस आहे. संत सखुबाई देहाने घरी होती, पण मनाने पंढरीत होती. पायी पालखी सोहळ्याला मुकल्याचे शल्य आहेच.
ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे म्हणाले, “जगाला समतेचा संदेश देणारा आषाढी वारी सोहळा आहे. पायी वारी रद्द झाली तरी घरी बसून मनाने दररोज दिंडीत चालत आहोत. दिवसभर नामचिंतन, ग्रंथवाचन या पद्धतीने दिनक्रम चालू आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की, भगवंताचे नामचिंतन केल्यानंतर सर्व साधना केल्या सारखे आहेत. त्यामुळे या वर्षी मानसिक वारी करत आहोत.”
चौकट
“शेकडो वर्षांपासून अव्याहतपणे चालत आलेली वारीची उज्ज्वल, तेजस्वी, दिव्य आणि विशुद्ध परंपरा आजतागायत त्याच निर्मल भक्ती हेतूने चालू आहे. वारकरी अत्यंत निष्ठेने वारी करतात. परंतु संपूर्ण जगताचा विचार करून त्यांनी विराट स्वरूपातली वारी अत्यंत मर्यादित स्वरूपात केली. वारकरी पंढरीला जाण्यासाठी रात्रंदिवस तळमळतो. विश्वावरील महामारीचे संकट लवकरात लवकर निवृत्त होऊन पुन्हा हे विश्व आनंद, शांती आणि समाधानाच्या अधिष्ठानावर विराजित व्हावे, ही कृपासिंधु पांडुरंगचरणी प्रार्थना आम्ही मानसिक वारीतून करणार आहोत.”
-ह.भ.प माऊली महाराज काकडे