पॅरिसला जाण्यासाठी तेलतुंबडेंना विद्यापीठाने पैसे दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 07:38 PM2019-01-30T19:38:42+5:302019-01-30T19:40:26+5:30
डॉ. तेलतुंबडे यांना एप्रिल २०१८ मध्ये पॅरिसला जाण्यासाठी माओवादी संघटनेने ७ ते १० लाख रुपये मदत केल्याचे नमूद करण्यात आलेला एक मेल पोलिसांना मिळाला आहे.
पुणे : प्रा. डॉ. आनंद तेलतुंबडे हे नामांकित प्राध्यापक असून ते अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरुन पॅरिसला गेले होते आणि विद्यापीठानेच त्यांचा जाणे-येण्याचा खर्च केला होता. या दौ-याचा माओवाद्यांशी कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात बुधवारी केला.
डॉ. तेलतुंबडे यांना एप्रिल २०१८ मध्ये पॅरिसला जाण्यासाठी माओवादी संघटनेने ७ ते १० लाख रुपये मदत केल्याचे नमूद करण्यात आलेला एक मेल पोलिसांना मिळाला आहे. मात्र, डॉ. तेलतुंबडे यांचे बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेच्या नेत्यांशी संपर्क असल्याचा उल्लेख केवळ पोलिसांनीन्यायालयात दाखल केलेल्या पाच पत्रात आहे, त्याशिवाय कोणताही ठोस पुरावा पोलीसांकडे नाही. संबंधित पत्र संशयित अटक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या लॅपटॉपमधून मिळाल्याचा दावा पोलीस करीत असून सदर पत्र बनावट आहे, असेही अॅड. नहार यांनी न्यायालयास सांगितले.
नहार म्हणाले, एल्गार परिषदे संदर्भात पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन काही पत्र प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली. एखाद्या गंभीर प्रकरणाचा तपास करताना अशाप्रकारे कृत्य करणे योग्य नाही. नागपूर येथील प्रा. शोमा सेन यांच्या लॅपटॉपमध्ये २०१७ मध्ये तेलतुंबडे पॅरिसला जाण्याचा ईमेल संदर्भ मिळाला आहे. त्यामध्ये त्यांनी पॅरिस परिषदेत जाऊन कोरेगाव-भीमा विषयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणी करून विषय ज्वलंत ठेवावा, असे सांगितल्याचे नमूद आहे. प्रत्यक्षात कोरेगाव भिमाची घटना एक जानेवारी रोजी घडली असल्याने संबंधित ईमेल बनावट आहे. मूळ तक्रार ही एल्गार परिषदेची असताना त्यात कोरेगाव भीमाच्या माध्यमातून अन्य गोष्टींचा समावेश तपासात केला जात आहे. या प्रकरणात दहशतवादी कृत्य असल्याचे सांगत युएपीए कलम अंतर्भूत करण्यात आले आहे, मात्र असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याने सदर कलम लावण्याची गरज नव्हती. तेलतुंबडे यांच्यावर अन्य कोणत्याही प्रकारचे आरोप झालेले नाहीत. जर पोलिसांना त्यांच्याकडे पैशांच्या देवाणीघेवाणीसाठी तपास करावयाचा असेल तर त्यांनी ती माहिती बँकेकडून मिळू शकते. तेलतुंबडे यांना नमेकी कशासाठी अटक करावयाची आहे आणि त्यांच्याकडे कोणत्या गोष्टीची चौकशी करावयाची आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप भूमिका जाहीर केली नाही. तेलतुंबडे चौकशीसाठी हजर राहू शकतात मात्र, पोलिसांनी त्यांना नोटीस दिलेली नाही. या संदर्भात जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार या गुरुवारी आपली बाजू न्यायालयासमोर मांडणार आहे.