कष्टकऱ्यांच्या आक्रोशाने भिंतींनाही पाझर
By admin | Published: July 30, 2016 05:12 AM2016-07-30T05:12:15+5:302016-07-30T05:12:15+5:30
रक्तामांसाचा चिखल... एकमेकांवर पडलेले मृतदेह... आक्रोशणारे कष्टकरी असे काळजाला पीळ पाडणारे चित्र बालेवाडी येथील हाय स्ट्रीट रस्त्यावरच्या मॅकडोनाल्डसमोरील पार्क एक्स्प्रेस प्राईड
पुणे : रक्तामांसाचा चिखल... एकमेकांवर पडलेले मृतदेह... आक्रोशणारे कष्टकरी असे काळजाला पीळ पाडणारे चित्र बालेवाडी येथील हाय स्ट्रीट रस्त्यावरच्या मॅकडोनाल्डसमोरील पार्क एक्स्प्रेस प्राईड सोसायटीच्या आवारामध्ये पाहायला मिळाले. ‘चूक एकाची आणि शिक्षा भलत्यालाच’ अशी एकंदर स्थिती या ठिकाणी होती. बेकायदा बांधकामाचे पुन्हा एकदा गरीब मजूर बळी ठरले आहेत. या मजुरांचा करुण अंत पाहून इमारतीच्या निर्जीव भिंतीही आक्रोशल्या आहेत.
महापालिकेने बारा मजल्यांचीच परवानगी दिलेली असताना कायदा धुडकावत तेराव्या मजल्याचे बेकायदा बांधकाम या ठिकाणी सुरू करण्यात आले. तेराव्या मजल्याचा स्लॅब भरत असतानाच ही दुर्घटना घडली. तेथे काम करणाऱ्या मजुरांमध्ये ठेकेदार आणि सुपरवायझरचे नातेवाईकही होते. या सोसायटीच्या आधीच्या इमारतींचे बांधकाम झालेले आहे. मात्र, ही दुसरी फेज हाती घेण्यात आली होती. साधारणपणे दीड वर्षापूर्वी या फेजचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या इमारतीचा पहिला स्लॅब आॅक्टोबर २०१५ मध्ये पडला होता. तशा तारखेची नोंद येथील मजल्यावर आहे.
स्वत:ला सावरत पारस साहा आणि बाबूलाल रॉय यांनी त्यांच्या हाती लागलेल्या स्लॅबच्या सळ््या धरल्या, तर कृष्णा ठाकूर याने तेथेच सिमेंटमध्ये घुसलेला पाइप पकडून ठेवला. त्यामुळे हे तिघे वाचले. मात्र, अन्य नऊ जण थेट खाली कोसळले. पारस साहा याने तर आपला भाचा बिपीन ठाकूर याचा स्वत:च्या नजरेसमोर पडून मृत्यू होताना पाहिले. या दुर्घटनेचे साक्षीदार असलेल्या ठेकेदार भविन साहाचा भाचा आणि सुपरवायझर सरवन साहा याचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यावर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, आयुक्त कुणाल कुमार, उपमहापौर मुकारी अलगुडे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, विधी समिती अध्यक्ष कैलास गायकवाड, प्रभाग समिती अध्यक्षा संगीता गायकवाड यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त डॉ. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव माने, पोलीस निरीक्षक उदय शिंगाडे यांनी अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या जवानांसह बचावकार्याला सुरुवात केली. यामध्ये स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांचीही मोठी मदत मिळाली.
आयुष्याची ‘सळई’ बळकट म्हणून तो वाचला
स्लॅब कोसळताच सर्व जण विद्युतवेगाने खाली पडले. काही सुचायचा अवकाश मात्र पारस साहा याने प्रसंगावधान राखत जवळची एक सळई घट्ट पकडून ठेवली. त्यामुळे त्याचे प्राण बचावले. मात्र, त्याचा भाचा बिपीन त्याच्यासमोरच मृत्युमुखी पडला. सर्व कामगार बिहार राज्यामधील समस्तीपूर जिल्ह्यातील आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांचे नातेवाईक बिहारमध्येच आहेत. त्यांना याबाबत माहिती कळवण्यात आली आहे. या बांधकाम साईटवर समस्तीपूरमधून आलेले बारापेक्षा अधिक कामगार काम करीत होते. साईटवरच राहत असलेल्या कामगारांना सकाळी लवकरच कामाला जुंपले जात होते, असेही पारस ठाकूर याने ‘लोकमत’ला सांगितले.
शोधपथक स्थापन करणार : महापौर
पुणे : महापालिकेच्या बांधकाम विभागाचे बेकायदा बांधकामाकडे दुर्लक्ष होत आहे, हे गंभीर आहे. त्यामुळेच आयुक्त कुणाल कुमार यांना या प्रकारची परवानगी नसलेली बांधकामे शोधण्यासाठी शोधपथक स्थापन करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली. बालेवाडीतील अपघाताची पूर्ण चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासही सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिकांना पालिकेचा कसलाही धाक राहिलेला नाही, हे यावरून स्पष्ट होते.
परवानगी नसतानाही बांधकाम केले जात असेल व त्यात असा काही जणांचा जीव जात असेल तर पालिकेसाठी ती अत्यंत खेदाची गोष्ट आहे. त्यांना १२ च मजल्यांची परवानगी असताना ते १३ व्या मजल्याचे बांधकाम कसे करू शकतात. असे बांधकाम एका दिवसात होत नाही. ते सुरू असताना बांधकाम विभागाचे त्या क्षेत्राचे निरीक्षक काय करीत होते, असा प्रश्न महापौर जगताप यांनी उपस्थित केला. याचीही चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना दिले असल्याचे ते म्हणाले. बांधकाम व्यावसायिकांची बेपर्वा वृत्ती, बांधकाम विभागाचा निष्क्रियपणा यातून गरीब कामगारांचे बळी जात असतील तर ते यापुढे सहन केले जाणार नाही. शोधपथक स्थापन करून अशी बांधकामे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महापौरांनी दिली. (प्रतिनिधी)
बांधकाम अधिकृतच असल्याचा कंपनीचा दावा
पुणे : अपघात दुर्दैवीच आहे, मात्र त्यावरून बांधकाम अनधिकृत असल्याचे बोलले जात आहे. सर्व मजल्यांचे बांधकाम अधिकृतच आहे, असा दावा प्राईड पर्पल प्रॉपर्टीज कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट (सेल्स अॅण्ड मार्केटिंग) राजेश नारंग यांनी केला. अपघातात मृत झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींनाही आर्थिक मदत देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
बालेवाडी येथे या कंपनीच्या बांधकाम संकुलातील एका इमारतीच्या १३ व्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू असताना त्याचा एक भाग कोसळून त्यात ९ कामगार मुत्युमुखी पडले. या अपघाताबद्दल बोलताना नारंग म्हणाले, ‘‘बांधकाम अनधिकृत असल्याचे बोलले जात आहे, मात्र ते अधिकृत असल्याची कागदपत्रे कंपनीकडे आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असल्याचीही नोंद आहे. अपघात कोणत्याही मजल्यावर घडला असला तरी तो दुर्दैवीच आहे, मात्र मजल्याचा वाद विनाकारण निर्माण केला जात आहे.’’ ‘‘बांधकामाचे कंत्राट देण्यात आले होते. त्यासाठीच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आल्यानंतरच करार केला गेला आहे. संबंधिताने सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे होते. त्याकडे आम्हीही लक्ष देणे आवश्यक होते. काही गोष्टींत गलथानपणा झाला, ही वस्तुस्थिती आहे. कंपनीने त्याची गंभीर दखल घेतली आहे. कायदेशीर कारवाई काय होईल, त्याला आम्ही सामोरे जाऊ,’’ असे नारंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
परवानगी न घेताच वाढवले जातात इमारतींचे मजले
पुणे : महापालिकेची परवानगी न घेता बांधकाम करण्याचे व नंतर हितसंबंधांद्वारे ते नियमित करण्याचे प्रकार शहरात सर्रास घडत आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाची कार्यपद्धतीच याला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. बांधकाम सुरू होताना व नंतर ते थेट पूर्ण झाल्यावरच बांधकाम विभागाकडून त्याची तपासणी होते. प्रत्यक्ष बांधकाम सुरू असताना ते नियमानुसार होते आहे किंवा नाही, हे तपासण्याची पद्धतच बांधकाम विभागात नाही, असे दिसते आहे.
बांधकाम विभागाच्याच माहितीनुसार परवानगी न घेता इमारतीचे मजले वाढवले अशा एकूण ३७ इमारती शहरात आहेत. त्यातील फक्त १६ बांधकामांना नोटीस बजावण्यात आली आहे. ७ बांधकाम व्यावसायिकांची प्रकरणे न्यायालयात आहेत. त्यात स्थगिती मिळाल्यामुळे कारवाई करता येत नाही. उर्वरित प्रकरणांमध्ये ते बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात परवानगी न घेता बांधकाम केल्याचे, इमारतींचे मजले वाढविण्याची अनेक प्रकरणे असल्याची चर्चा आहे. त्यांना मोकळे कसे सोडले गेले, अशी विचारणा होत आहे.
बांधकाम व्यावसायिकाने परवानगी मागितली, की त्यात डोंगर, नदी, नाले येत नाही ना, याची तपासणी करून परवानगी दिली जाते. त्यानंतर बांधकामाचा पाया भरून झाला, की एकदा तपासणी होते. पहिल्या मजल्याचे काम झाले, की इमारतीच्या तिन्ही बाजू, समोरची बाजू, पार्किंग, गॅलरी यांची तपासणी होते. त्यानंतर मात्र थेट इमारत पूर्ण झाल्यानंतरच पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी अर्ज आल्यानंतरच तपासणी केली जाते. प्रत्यक्ष बांधकाम सुरू असताना तपासणी करण्याची पद्धतच बांधकाम विभागात नाही. त्यामुळेच बांधकाम व्यावसायिकाला त्याचा फायदा असेल तसे बांधकाम करणे शक्य होते. (प्रतिनिधी)
१२ मजल्यांचीच होती परवानगी
अपघात झालेल्या इमारतीलाही फक्त १२ मजल्यांचीच परवानगी होती. त्यांनी १३ व्या, १४ व्या मजल्यांसाठी परवानगी मागितली होती, मात्र ती मिळण्यापूर्वीच १३ व्या मजल्याचे बांधकाम सुरू केल्याचे उघड झाले आहे. याच पद्धतीने शहरात अनेक इमारतींचे बांधकाम झाले असल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. आता अपघात झाल्यानंतर महापौरांनी शोधपथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत, तर आयुक्तांनी अशी बांधकामे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र विनापरवानगी बांधकामे होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम विभागावर काय कारवाई होणार, याविषयी मात्र कोणीही बोलायला तयार नाही.
दोषींवर कायदेशीर कारवाई होणार
पार्क एक्स्प्रेस प्राईड सोसायटीच्या तेराव्या मजल्याचा स्लॅब सकाळी साडेदहाच्या सुमारास कोसळला. या घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बांधकामासाठी वापरलेल्या मालाचा दर्जा तपासण्यासाठी त्याचे नमुने घेऊन न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
- शशिकांत शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, उत्तर विभाग