चित्रकलेला हवी साधनेची जोड- द. मा. मिरासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 03:16 AM2019-03-14T03:16:00+5:302019-03-14T03:16:04+5:30

साई चित्रकला महाविद्यालयात कलाप्रदर्शन

Painted wants add-on. Ma Mirasdar | चित्रकलेला हवी साधनेची जोड- द. मा. मिरासदार

चित्रकलेला हवी साधनेची जोड- द. मा. मिरासदार

Next

पुणे : कलेचाच उपासक असल्याने साहित्य क्षेत्रात काम केले. चित्रकलेला साधनेची जोड असल्याशिवाय प्रावीण्य मिळत नाही. कोणत्याही कलेचा आनंद घेण्यासाठी त्या कलेचे शास्त्रशुद्ध ज्ञान आवश्यक असते. चित्रकलेमध्ये शब्द, भाषा, सीमारेषा यांचा अडसर येत नाही. कारण चित्रकला ही जागतिक भाषा आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी व्यक्त केले.

साई चित्रकला महाविद्यालयातर्फे १८व्या वार्षिक कलाप्रदर्शनाचे उद्घाटन द. मा. मिरासदार यांच्या हस्ते अभिनव पद्धतीने करण्यात आले. या वेळी त्यांनी कॅनव्हासवर फिरवलेल्या कुंचल्यातून रंगरेषांचे महत्त्व अधोरेखित झाले. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक विलास पाटील, कलादिग्दर्शक श्याम भुतकर, नगरसेवक प्रकाश कदम, संस्थेचे सचिव सुभाष क्षीरसागर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते १८व्या राज्यस्तरीय प्रत्यक्ष न्यूड लाईफ चित्रण व निसर्गचित्रण स्पर्धेची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

द. मा. मिरासदार म्हणाले, ‘‘चित्रकलेच्या प्राथमिक दोन परीक्षा मी उत्तीर्ण झालो; परंतु चित्रकार होऊ शकलो नाही. चित्रकलेच्या शिक्षकांनी स्तुतीस पात्र ठरण्यासाठी मी दोन सरळ रेषा व चार आडव्या रेषा आखत शिडीचे चित्र काढले. उभे पकडण्याऐवजी त्यांनी ते आडवे पकडले. नेहमीच्याच शैलीत विचारले असता हे शिडीचे चित्र आहे, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ते चित्र आडवे धरले असल्याकारणाने तिरडीचे चित्र वाटले. त्यांची ही प्रतिक्रिया ऐकून मी डोक्यालाच हात लावून घेतला.’’ साई चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय ठोबे यांनी प्रास्ताविक केले. चित्रकार मल्लिकार्जुन सिंदगी यांनी आभार मानले.

सौंदर्याचे मोकळ्या मनाने कौतुक व्हावे...
विलास पाटील म्हणाले, ‘‘सृष्टी सौंदर्याने नटलेली आहे. पक्षी, मासे, फुलपाखरे यांची निर्मिती करणारा निर्माता हा सर्वांत मोठा कलाकार आहे. व्यक्तीने सौंदर्यपूजक असावे आणि सौंदर्याचे मोकळ्या मनाने कौतुक आणि स्वागत करावे.’’
श्याम भुतकर म्हणाले, ‘‘नाट्य-चित्रसृष्टीत वावरत असताना चित्रकलेमुळे मला जी दृष्टी प्राप्त झाली; त्यामुळे माझा पाया पक्का झाला. सृजनशीलतेतला भाग मला होता आले ते केवळ चित्रकलेमुळेच. चित्रकलेचे व्याकरण शिकायचे असल्यास न्यूड चित्रकलेत प्रावीण्य मिळविणे अत्यावश्यक आहे. केवळ पैशांच्या मागे न धावता चित्रकलेवर निष्ठा ठेवावी.’’

Web Title: Painted wants add-on. Ma Mirasdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.