वानराचे जोडपे पुण्यात आले अन् जीव गमावून बसले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:07 AM2020-12-28T04:07:21+5:302020-12-28T04:07:21+5:30
पुणे : शहरात आल्यानंतर कधी कोणाचा जीव जाईल, हे सांगता येत नाही. वन्यजीवांची तर कोणी कदरच करत नाही. काही ...
पुणे : शहरात आल्यानंतर कधी कोणाचा जीव जाईल, हे सांगता येत नाही. वन्यजीवांची तर कोणी कदरच करत नाही. काही दिवसांपुर्वी गव्याला आपला जीव गमवावा लागला, तर शनिवारी दोन वानराच्या जोडप्याला देखील आपले प्राण रस्त्यावर सोडावे लागले. कारण दोन वाहनांनी दोघांना धडक दिली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खराडी बायपास रस्त्यावरील माजी महापौर चंचला कोद्रे पुलावर घडली.
शनिवारी (दि. २६) दुपारी ३ वाजता वानर नर मादी पुलावर जात असल्याचे दिसले. मादी अचानक रस्ता ओलांडत असताना एका चार चाकी वाहनाने तिला जोरदार धकड दिली. रस्त्यावर पडलेल्या मादीला पाहण्यासाठी नर वानर जात असतानाच त्यालाही एका वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्या दोघांचा त्या रस्त्यावर जीव गेला.
याची माहिती मिळताच खराडी स्मशानभूमीतील सेवक कैलास भगत आणि वाईल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन चे सदस्य साईदास कुसळ, नीता गजरे, ऋषी ढावरे, सतीश भवाळ, अशोक जाधव आदींनी एकत्र येऊन या दोन्ही वानरांना रस्त्याच्या बाजूला घेतले. त्यानंतर वन विभागाला त्याची माहिती देण्यात आली. वन विभागाच्या परवानगीनेच खराडीत भगत यांनी स्वखर्चाने खराडी -शिवणे रस्त्याच्या बाजूला खड्डा खोदून विधिवत अंत्यसंस्कार केले.
----------------------------
एक वानर बचावले...
पुलावर एकूण तीन वानर फिरत होते. त्यापैकी एक वानर घाबरून पळून गेले, तर दोघांचा अपघातात मृत्यू झाला. यामुळे मुंढवा-खराडी परिसरात ही माहिती समजताच अनेकजण अंत्यसंस्कारासाठी जमा झाले होते. हे तीन वानर कुठून आले, याची माहिती मात्र कोणालाही नाही.
--------------------
समाधीवर रोप लावून श्रध्दांजली
दोन्ही वानरांना खड्डा करून अत्यंसंस्कार केले. त्यानंतर तिथेच एक रोप लावून ते वाढविण्याचा प्रण कैलास भगत यांनी केला आहे. या दोन्ही वानरांच्या स्मृतिप्रित्यार्थ हे रोप त्या ठिकाणी वाढविण्यात येणार आहे. तसेच तिथे समधीस्थळही करण्यात येणार आहे.
--------------
वन्यप्राण्यांच्या जीवाचे नाही मोल...
खराडीतील पुलावर हे वानर फिरत असताना वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. खरं म्हणजे धडक दिल्यानंतर तिथे थांबणे अपेक्षित होते. शहरातच जर वन्यजीवांची अशी अवस्था होत असेल, तर त्यांनी कोणाकडे दाद मागायची. याच ठिकाणी दोन माणसे असती, तर त्याचा मोठा ‘गवगवा’ झाला असता, पण वन्यजीव असेल तर त्याकडे मात्र कोणाचेही लक्ष जात नाही.