बैल्हा बाजारात ४५ ते ६० रूपयांना बैलजोडी; कोरोनामुळे उलाढाल रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:16 AM2021-02-17T04:16:38+5:302021-02-17T04:16:38+5:30
बेल्हा : येथील प्रसिध्द असणाऱ्या आठवडे बैल बाजारात सोमवारी बैलांची आवक वाढूनही बैलांचे भाव मात्र स्थिरच होते. ४५ ते ...
बेल्हा : येथील प्रसिध्द असणाऱ्या आठवडे बैल बाजारात सोमवारी बैलांची आवक वाढूनही बैलांचे भाव मात्र स्थिरच होते. ४५ ते ६० हजार रुपये असा उच्चांकी भाव बैलजोडीला मिळाला. मात्र, कोरोनामुळे गेल्या ११ महिन्यांपासून या बाजारातील उलाढाल रोडावली आहे.
या बाजाराबरोबरच शेळी मेंढीचा बाजार, तरकारी बाजार तसेच कडधान्य बाजार मोठा भरतो. या ठिकाणी संगमनेर, नाशिक, लासलगाव, कल्याण, नांदेड, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतून व तालुक्यांतून शेतकरी व व्यापारी बैल खरेदी विक्रीसाठी येतात. या प्रसिध्द असणाऱ्या बैल बाजारात गावठी, म्हैसुरी, खिल्लारी व पंढरपुरी बैल विक्रीसाठी येतात. या बैलबाजारात बैलांची आवक बऱ्यापैकी होती. मात्र, बैलांचे भाव मात्र स्थिरच होते. गेले काही दिवसांपासुन या बैल बाजारात बैलांना जास्त भाव मिळतच नाही. बैलगाडा शर्यती चालू झाल्याशिवाय बैलबाजारात आवक वाढणार नाही असे अनेक व्यापारी व शेतकऱ्यांनी सांगितले. बाजारात गावठी बैलांना जास्त मागणी होती.
चौकट
बैल बाजारात खिल्लारी बैलजोडीचे भाव ४५ ते ५० हजार रुपये तर गावठी बैलजोडीचे भाव ४५ ते ६० हजार रुपये असे होते. कोरोनामुळे या बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. सोमवारच्या बैलबाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. बैलांची आवक ३७५ एवढी झाली, तर विक्री २८७ एवढी झाली. तसेच म्हशींची १०४ आवक झाली तर विक्री १०० झाली. खरेदी विक्रीचे व्यवहार ओळखीवर, उसनवारीवर व इसार देउन होतात. बैलबाजारात बैलांचे व्यवहारही चांगले झाले असल्याची माहिती बाजार समितीचे कार्यालयीन प्रमुख प्रमोद खिल्लारी यांनी दिली.
चौकट
एका जनावराचा दिवसाचा खर्च ५०० रुपये
सुका चारा, ओला चाऱ्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. दुभती जाणावे, तसेच बैलाचा आहार जास्त असतो. एका जनावराला दीड किलो पेंड लागते. यासोबतच सुका आणि ओला चाराही लागतो. या चाऱ्याची किंमत वाढली आहे. यासाठी ५०० रूपये खर्च पशुपालकांना येतो. यामुळे जनावरे सांभाळणे पशुपालकांना कठीण झाले आहे.
चौकट
दुधाळ जनावरांची मागणी घटली
बेल्हा येथील बैलांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. पूर्वी या ठिकाणी राज्यभरातून व्यापारी खरेदी विक्रीसाठी येत होते. येथे येथे येणारे जनावरांचा दर्जाही चांगला प्रतीचा असायचा. मात्र, शेतीचे यांत्रिकीकरण वाढल्याने जनावरांची मागणी कमी झाली आहे. तसेच जनावरे सांभाळणे कठीण झाल्याने दुधाळ जनावरांची मागणी घटल्याचे चित्र सोमवारच्या बाजारात पाहायला मिळाले.
उलाढालीवरही झाला परिणाम
बेल्हा येथील बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत होती. मात्र, जनावरांना असलेली मागणी दिवसेंदिवस कमी होत असल्याने याचा परिणाम बाजाराच्या उलाढालीवर होत आहे. या वर्षी कोरोनामुळे जवळपास वर्षभर बाजार बंद होता. त्यात कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक व्यापारी बाजारात येतच नाहीत. यामुळे पूर्वी होणारी ऊलाढाल आता होत नाही.
शेतकरी प्रतिक्रिया-
सध्या शेतकरीवर्ग बैलबाजारातून महागडे बैल खरेदी न करता यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने शेती करुन घेत आहे. शेतीची मशागत लवकर होत आहे. -
विष्णू निकम-
कोट
सध्या यांत्रिकीकरणाचा परिणाम शेतीवर झाला आहे. जमिनीची पाणी धारणाक्षमता कमी झाली. तसेच जमिनीची सुपीकता कमी झाली. जमीन नापीक झाली. ओली असणारी माती तुडविली गेली. - दत्ता खोमणे-
कोट
सध्या जनावरे सांभाळणे शेतकरी वर्गांना अवघड झाले आहे. एका दिवसाचा बैलजोडीचा जनावराचा खर्च ५०० रुपयांच्या आसपास येतो. त्यामध्ये ओला चारा, सुका चारा व पशुखाद्य असा आहे. त्यातही महागाई जास्त वाढली आहे.
शंकर शेंडगे-
कोट
सध्या कोविडमुळे अनेक व्यापारी व शेतकरी बाजारात येत नाहीत. काही व्यापारीवर्गांनी याकडे पाठच फिरवली आहे. कोविडमुळे बाजारात मंदीचे वातावरण आहे. चलनवलन फिरतच नाही. कांद्यालाही भाव नाही.
- बाळासाहेब भोरे, व्यापारी
फोटो खालील मजकूर पुढीलप्रमाणे आहे.
बेल्हा (ता. जुन्नर) येथील आठवडे बैलबाजारात बैलांची आवक झालेली दिसत आहे.