खेड तालुक्यात लागल्या पैजा !

By admin | Published: February 22, 2017 01:55 AM2017-02-22T01:55:14+5:302017-02-22T01:55:14+5:30

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी खेड तालुक्यात सुमारे ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ६९ उमेदवारांचे

Pajas in Khed taluka! | खेड तालुक्यात लागल्या पैजा !

खेड तालुक्यात लागल्या पैजा !

Next

राजगुरुनगर : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी खेड तालुक्यात सुमारे ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ६९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये आज बंद केले. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून, कार्यकर्त्यांनाही मतमोजणीचे वेधलागले आहेत.
खेड तालुक्यात ७ जिल्हा परिषद गटांसाठी व १४ पंचायत समिती गणांसाठी शांततेत मतदान झाले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सुरुवातीला सकाळी मतदारांमध्ये थोडासा उत्साह जाणवत होता. सकाळी साडेनऊपर्यंत ११.५३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला, तर साडेअकरापर्यंत २५ टक्के मतदान झाले. दुपारी सर्वच मतदान केंद्रांवर शांतता होती. दीडपर्यंत ही टक्केवारी ४०.५२ टक्यांपर्यंत पोहोचली. साडेतीनपर्यंत १ लाख २९ हजार ९ मतदारांनी हक्क बजावून ५२.७० टक्के मतदान झाले. ज्या गावातील उमेदवार होते. त्या गावांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह जास्त होता. त्यामुळे तेथे मतदान करून घेण्याकडे जास्त कल होता. दरम्यान, अनेक मतदान केंद्रांवर केंद्रातील मतदार यादी व कार्यकर्त्यांकडील मतदार यादी यामध्ये बदल असल्याने मतदारांचा गोंधळ होत होता.
या संदर्भात तहसीलदार सुनील जोशी म्हणाले, की उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी असलेली मतदार यादी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच्या याद्या केंद्रानुसार केल्यामुळे फरक होता. मात्र, कार्यालयाकडून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना कालच नवीन याद्या पुरवल्या होत्या. तरीही, ज्या ठिकाणी हा गोंधळ झाला, तेथे केंद्राध्यक्षांकडे असलेल्या ३ याद्यांपैकी एक यादी स्थानिक केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे दिली होती. त्यामुळे मतदारांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. एकाच वेळी निवडणुकीमुळे दुहेरी मतदानाला आळा जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी झाल्यामुळे शहरात व गावी दोन्हीकडे मतदार यादीत नाव असणाऱ्यांची या वेळी गोची झाली. त्यांना एकाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावता आला. यापूर्वी दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या दिवशी होत असल्यामुळे हे मतदार दोन्ही ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत होते. मात्र, या वेळी उमेदवाराने केलेल्या सोयीनुसार शहरात किंवा गावी मतदान झाले. खेड तालुक्यामधील पश्चिम भागातील अनेक लोक कुटुंबासहित मुंबईला नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत; परंतु त्यांची नावे गावालाही यादीमध्ये आहेत. तेथील उमेदवारांनी या मतदारांसाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे व कागदपत्रे जमा करण्यासाठी हुतात्मा राजगुरू क्रीडासंकुलावर व्यवस्था करण्यात आली असून, संकुलामध्येच इमारतीत सर्व मतदान यंत्रे सीलबंद करून ठेवण्यात येणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता जवळच्या मतदान केंद्रांवरील साहित्य जमा करण्यास सुरुवात झाली, तर तालुक्यातील एक क्रमांकाचे मतदान केंद्र भीमाशंकर येथील साहित्य रात्री उशिरा जमा झाले. (वार्ताहर)

Web Title: Pajas in Khed taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.