पाकिस्तानी नोट पुण्यात कशी आली? भुकूम येथील सोसायटीत आढळली पाकिस्तानी चलनातील नोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 14:53 IST2025-02-09T14:52:26+5:302025-02-09T14:53:15+5:30
हा प्रकार नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) च्या हद्दीपासून काही मीटर अंतरावर घडला आहे.

पाकिस्तानी नोट पुण्यात कशी आली? भुकूम येथील सोसायटीत आढळली पाकिस्तानी चलनातील नोट
- किरण शिंदे
पुणे - मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटी सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनाची नोट आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) च्या हद्दीपासून काही मीटर अंतरावर घडला आहे.
सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांच्या निदर्शनास लिफ्टच्या बाहेर ही नोट आढळली. त्यानंतर त्यांनी तातडीने बावधन पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
सापडलेली पाकिस्तानी नोट वापरात असलेली असून, तिची स्थिती पाहता ती अनेक वेळा वापरण्यात आल्याचे दिसून येते. ही नोट कोणाच्या खिशातून चुकून पडली की ती अन्य कोणत्या कारणाने येथे आली, याचा तपास करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
पाकिस्तानी नोट पुण्यात कशी आली? असा प्रश्न चर्चेत आला आहे. या प्रश्नाचे उत्तर अद्याप स्पष्ट झालेले नसून, बावधन पोलीस सखोल चौकशी करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.