पाकिस्तानी महिलेला अटक
By admin | Published: July 29, 2014 03:16 AM2014-07-29T03:16:30+5:302014-07-29T03:16:30+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यात राहत असल्याचे दाखवून पासपोर्ट काढणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यात राहत असल्याचे दाखवून पासपोर्ट काढणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातून ही महिला मुंबईतील नातेवाइकांना भेटण्यासाठी येत असताना तपासणीमध्ये तिच्याकडे हा पासपोर्ट मिळून आला. त्यानंतर तिला अटक करून बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुलजार अब्दुल मंजीयानी (वय ४७, रा. पाकिस्तान) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. मंजीयानी ही मूळची मुंबईची आहे. तिने ती लष्कर परिसरात राहत असल्याचे दाखवून २००९मध्ये पासपोर्ट काढला. तिचा साडेतीन वर्षांपूर्वी पाकिस्तानात राहणाऱ्या व्यक्तीशी विवाह झाला आहे. तिच्याकडचा पासपोर्ट बनावट असल्याचे आढळून आल्याने अमृतसर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले.
बंडगार्डन पोलीस ठाण्यातील कर्मचारी दिगंबर घोरपडे याने पत्त्याची पडताळणी न करता अनेकांचे रिपोर्ट दिल्याचे २०११मध्ये उघडकीस आले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत मॉडेल जिया चोपरा, नृत्यांगना वेदिका शिवसागर, अरविंद भट, अभय लोखंडे, रजनीश गुजर यांच्यासह १४ जणांना अटक केली आहे. तब्बल ९१ जणांनी बनावट पासपोर्ट काढल्याचे आढळून आले आहे. (प्रतिनिधी)