तब्बल चार महिने सोसला पाकिस्तानचा अनन्वित छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:08 AM2017-08-15T00:08:56+5:302017-08-15T00:09:00+5:30

‘मरू पण झुकणार नाही,’ अशी दुर्दम्य जिद्द बाळगत आम्ही पाकिस्ताननेकेलेला अनन्वित छळ सोसला.

Pakistan's infinite persecution for four months | तब्बल चार महिने सोसला पाकिस्तानचा अनन्वित छळ

तब्बल चार महिने सोसला पाकिस्तानचा अनन्वित छळ

googlenewsNext

मनोहर बोडखे।
दौंड : ‘मरू पण झुकणार नाही,’ अशी दुर्दम्य जिद्द बाळगत आम्ही पाकिस्ताननेकेलेला अनन्वित छळ सोसला. पाकिस्तानच्या सैन्याने हालहाल करून मारहाण केली, पण देशाची मान आम्ही खाली होऊ दिली नाही, हे शब्द आहेत दौंड तालुक्यातील नानवीज या गावी राहणाºया दिनकर पाटोळे या सैनिकाचे.
देशाचे संरक्षण करीत असताना १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात शत्रूराष्ट्राबरोबर दोन हात करता करता पाकिस्तान सैन्याने सहा भारतीय जवानांना पकडले होते. त्यातील एक जवान म्हणजे दिनकर पाटोळे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी पाकिस्तानने केलेल्या छळवादाची कहाणी कथन केली. पाकिस्तानच्या कैदेत तब्बल ४ महिने आणि २१ दिवस त्यांना राहावे लागले. अंगावर शहारे येतील, असे अत्याचार त्यांनी सहन केले. १९६५ ला पाटोळे यांच्यासह अन्य पाच जवान पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानी सैन्याशी लढा देत होते. पहाटे ४ वाजता पाकिस्तानी सैन्याने त्यांना पकडले आणि कैद केले. पाटोळे सांगत होते, पाकिस्तानमधील दुरगाई किल्ल्यात आम्हाला ठेवण्यात आले. या किल्ल्यात खूप भारतीय कैदी होते. दहा बाय दहाच्या खोलीत ५०-५० भारतीय कैदी बंदिवासात होते. रायफलचा मार खाल्ल्यानंतर आम्हाला जेवण मिळायचे. भारतीय सैन्यासह लष्कराच्या छावण्यांची माहिती विचारली जायची; परंतु आम्ही देशाशी कोणतीही गद्दारी केली नाही. दिवसेंदिवस अत्याचार वाढत गेले. भाकरीमध्ये चुना घालून द्यायचे. ते जेवल्यानंतर पोटात आग व्हायची. भाकरी खाल्ली नाही तर मारहाण व्हायची. त्या साडेचार महिन्यांत किती चुना पोटात गेला असेल, याला सीमा नाही. त्या किल्ल्यात बाराशेच्या जवळपास भारतीय कैदी होते. इतक्या कैद्यांसाठी एक स्वच्छतागृह आणि अंघोळीसाठी एकच नळ होता. मातृभूमीच्या प्रेमाखातर आम्ही सारा छळ मूकपणाने सहन केला.
युद्ध संपले तरी पाटोळे यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. सैन्य दलात लागत नव्हता. महिन्याभरानंतर सैन्य दलातून एक जवान नानवीज येथे सैनिकी पोशाख घेऊन आला आणि म्हणाला, दिनकर पाटोळे यांचा ठावठिकाणा नाही, मात्र रक्ताने बरबटलेला त्यांचा पोशाख सापडला आहे. कदाचित पाटोळे देशाच्या संरक्षणार्थ शहीद झाले असावेत. नानवीज गावावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र पत्नी तुळसाबाई यांचा त्यावर विश्वास नव्हता. त्यानंतरही त्यांनी कपाळावरचे कुंकू पुसले नाही. अखेर ६ भारतीय जवान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा सुगावा भारतीय सैन्य दलाला लागला. वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा झाला आणि या ६ जणांची सुटका झाली. तालुक्यासह नानवीज गावात आनंदोत्सव झाला. सैन्य दलातील १५ वर्षांच्या सेवेनंतर आता वयाच्या पंचाहत्तरीत असलेले पाटोळे मुले, सुना, नातवंडे यांच्यासमवेत आनंदी आयुष्य जगत आहेत.
पदरी मात्र फसवणूक आली...
देश संरक्षणात जिवाची पर्वा न करता सेवा केली. त्याबद्दल मला शासनाने ५ एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. तीन वर्षे या जमिनीत शेती केली. नंतर सदरची जमीन पुनर्वसनाची आहे, असे शासनाने सांगितले व ती जमीन परत घेतली. त्यानंतर शासनदरबारी कितीतरी पायºया झिजवल्या, परंतु पदरी काहीच पडले नाही, अशी खंत दिनकर पाटोळे यांनी व्यक्त केली.

Web Title: Pakistan's infinite persecution for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.