माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:53 AM2018-07-14T01:53:31+5:302018-07-14T01:53:45+5:30
आळंदीतून निघाल्यानंतर आजोळघरातील मुक्कामासह ७ मुक्काम करीत शुक्रवारी माऊलींच्या पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.
नीरा : आळंदीतून निघाल्यानंतर आजोळघरातील मुक्कामासह ७ मुक्काम करीत शुक्रवारी माऊलींच्या पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. रिमझिम पाऊसाच्या सरी अंगावर झेलत वारक-यांनी माऊलींना नीरास्नान घालून पुणेकरांचा निरोप घेतला.
संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास नीरा नदीच्या पैलतीरावर सातारा जिल्हा प्रशासन स्वागतासाठी व निरोप देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन उभे राहिले होते. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी संजय आसवले, तहसिलदार सचिन गिरी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, पुणे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक तेजस्वी सातपूते, भोर उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, जेजूरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, उपनिरीक्षक राजेश माळेगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, मनोज खोमणे, पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण विणेकर, महावितरण आदी यंत्रणांचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी पुणे जिल्ह्यातील भाविकांनी माऊलींच्या सोहळ्यास नीरा स्नानानंतर भावपूर्ण निरोप दिला.
अत्यंत भक्तिमय वातावरणात या सोहळ्याचे पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील पाडेगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आमदार मकरंद पाटील, वाईचे प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जि. प. सदस्य दिपाली साळूंखे, खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद मोटे, गटविकास अधिकारी दिपा बापट, मुख्ययकारी अधिकारी नितीन थाडे, खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव, आदी विविध पदाधिकारी, अधिकारी व सातारा जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत केले.
सोहळ्याच्या स्वागतासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण विणेकर, पंचायत सदस्य गोरखनाथ माने, सरपंच दिव्या पवार, उपसरपंच बाळासाहेब भोसले, विराज काकडे, रेखा चव्हाण, दत्ता चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, राजेश काकडे, चंद्रराव धायगुडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण जेधे, ग्रामपंचायत सदस्य राजेश चव्हाण, दिपक काकडे, अनिल चव्हाण, ग्रामसेवक सुभाष लिंबरकर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केले.
नीरास्नानाचा भक्तिपूर्ण सोहळा
१माउलींच्या पालखी सोहळ्यात नीरास्नानाचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुर्वी हा सोहळा पुण्याहून शिरवळ मार्गे लोणंदला जात असे. त्यामुळे सासवड, जेजुरी, वाल्हा, नीरा परीसरातील भावीकांना माऊलींच्या दर्शनाचा लाभ मिळत नसे.
२ब्रिटिश काळात वाल्हा गावचे कृष्णा मांडके या अभियंत्याने नीरा नदीवर स्वखचार्ने पुल बांधला. त्यामुळे हा पालखी सोहळा जेजुरी-नीरामार्गे पंढरपूरला जाऊ लागला. पालखी सोहळ्यात इंद्रायणी, नीरा व चंद्रभागा तीरावरील स्नानाला अधिक महत्त्व आहे.
३सोहळा पंढरीकडे प्रस्थान ठेवत असताना माऊलींच्या पादूकांना इंद्रायणीच्या पवित्र तिर्थात स्नान घालण्यात येते. त्यानंतर पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर सातारा जिल्ह्यात प्रवेशापुर्वी नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावरील पवित्र तिर्थातस्नान घालण्यात येते.
४यंदा दिवे घाट ते नीरा नदीपर्यंतच्या मार्गावर व्यावसायिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे पालखी रथ प्रत्येक ठिकाणी उशिरा पोचत होता. पोलीसांनी रस्त्यावरील अतिक्रमणे काढली पण सोहळ्या बरोबर आलेल्या व्यावसायिकांनी रस्ता अरुंद केला होता. पुढील काळात सोहळा मुक्कामाच्या ठिकाणीच व्यावसायिकांची व्यवस्था करावी. अशी अपेक्षा सोहळा वाहतूक प्रमूख पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
पुरंदरच्या
प्रशासनाचे कौतुक
माउलींच्या पालखी सोहळ्याने दिवे घाट पार करून पुरंदर तालुक्यात प्रवेश केल्यावर सलग चार दिवसांचा प्रवास हा सोहळा पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी,वाल्हा, नीरा या शहरातून करीत आहे. पुरंदर तालुक्यात पालखी सोहळा आल्यानंतर प्रशासनातील प्रत्येक खात्याच्या विविध अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये उत्साहाचे वातावरण चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सोहळ्याच्या सेवेसाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी उत्सूक दिसत होते.