भरपावसात लाच घेणाऱ्या पळसदेवच्या तलाठ्याला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:09+5:302021-06-18T04:09:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वारसांची नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी ८ हजारांची लाच इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील तलाठ्याने मागितली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वारसांची नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी ८ हजारांची लाच इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील तलाठ्याने मागितली. तलाठी खासगी व्यक्तीमार्फत लाच स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पौड रस्त्यावरील आयडियल कॉलनीसमोरील बसस्टॉपवर सापळा रचून भरपावसात ही कारवाई केली.
तलाठी राजेश उत्तम गायकवाड (वय ४०), संग्राम नथू भगत (वय ४१) या दोघांविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिला वकिलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांच्या आशिलाच्या वारसांची नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाडने १० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार वकिलांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याची आज पडताळणी केली. तेव्हा त्याने तडजोडीअंती ८ हजार रुपयांची मागणी करून ती खासगी व्यक्ती संग्राम भगत यांच्याकरवी स्वीकारताना सापळा रचून पकडण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत.
चौकट
जमीन इंदापुरात, कारवाई पुण्यात
या प्रकरणाशी संबंधित जमीन इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावात आहे. तक्रारदार महिला वकील आणि त्यांचे अशील पुण्याचे रहिवासी आहेत. तलाठी गायकवाडचा भाऊ पुण्यात राहतो. त्याच्याकडे गायकवाड आला होता. त्यामुळे लाचेची रक्कम त्याने पुण्यात स्वीकारण्याचे ठरवले. त्यानुसार गायकवाडने पौड रस्त्यावरील आयडियल कॉलनीसमोरील बसस्टॉपजवळ पैसे घेऊन येण्यास व संग्राम भगतकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तेथे पोहचल्या. त्यावेळी पाऊस सुरू होता. तरीही भररस्त्यात सापळा लावण्यात आला होता. तक्रारदाराकडून भगतने पैसे घेताच त्याला पकडले. तलाठी गायकवाडलाही लगेच ताब्यात घेण्यात आले.