पालिका बसथांबा ‘बीआरटी’ हब
By Admin | Published: July 29, 2016 03:57 AM2016-07-29T03:57:04+5:302016-07-29T03:57:04+5:30
महापालिका भवनाच्या मागील बाजूस असलेला पीएमपीचा बसथांबा ‘बीआरटी हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. पीएमपीने सुरू केलेल्या संगमवाडी ते नगर रस्ता आणि संगमवाडी
पुणे : महापालिका भवनाच्या मागील बाजूस असलेला पीएमपीचा बसथांबा ‘बीआरटी हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. पीएमपीने सुरू केलेल्या संगमवाडी ते नगर रस्ता आणि संगमवाडी ते विश्रांतवाडी या दोन्ही मार्गांसह औंध रस्त्यावर सुरू करण्यात येणाऱ्या बीआरटीसाठीचे हे हब असणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते महापालिका भवन या मार्गावर बीआरटी सुरू होणार आहे.
संचेती चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेपर्यंत बीआरटीसाठी मार्ग उभारला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली. त्यामुळे संगमवाडीपासून धावणारी बीआरटी आता पालिकेपासून धावणार आहे.
दोन वर्षांत महापालिकेकडून संगमवाडी ते नगर रस्ता आणि संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कोणतेही हब अथवा टर्मिनल उभारण्यात आलेले नाही. शहरातील पीएमपीच्या वेगवेगळ्या डेपोंमधून ज्या गाड्या नगर रस्ता किंवा विश्रांतवाडीकडे जातात, त्यातील काही गाड्या बीआरटी मार्गातून सोडण्यात येतात. संगमवाडीपासून पालिकेपर्यंत स्वतंत्र बीआरटी कॉरिडॉर करण्यात येणार आहे.
तीन मार्गांचे नियोजन
शहरात पायलट बीआरटी प्रकल्प राबविल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी महापालिकेने संगमवाडी ते विश्रांतवाडी आणि नगर रस्ता हा बीआरटी मार्ग सुरू केला आहे. प्रत्यक्षात बीआरटीसाठी आवश्यक असलेले ११० किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही पूर्ण झालेले आहे. मात्र, हे मार्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यातच नवीन दोन्ही मार्ग संगमवाडीपर्यंत असले तरी त्या ठिकाणी कोठेही बस टर्मिनल नाही. त्यामुळे तीन बीआरटी मार्गावरील गाड्या एकाच ठिकाणाहून सोडण्यासाठी महापालिका भवनाच्या बसथांब्यांची निवड करण्यात आली आहे. हा बसथांबा मध्यवर्ती भागात असल्याने तसेच पीएमपीच्या सर्व डेपोंमधून या ठिकाणी बस संचलन होत असल्याने हा थांबा बीआरटी हब म्हणून विकसित केला जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.