इंदापूर तालुक्यातील पालखी मार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे; हर्षवर्धन पाटलांचे नितीन गडकरींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:15 PM2023-06-16T12:15:06+5:302023-06-16T12:15:31+5:30
नितीन गडकरी यांनी पत्राची दखल घेत पालखी महामार्गाच्या चौकशीचे आदेश दिले
इंदापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतुन निर्माण झालेल्या पालखी महामार्गाचा आता पंचनामा होणार आहे. गडकरी यांची भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी(दि १४) दिल्लीत भेट घेवून पालखी मार्गाच्या कामासंदर्भात नागरिक व कार्यकर्त्यांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सूचना देऊन झालेल्या कामांची चौकशी करावी,अशी मागणी करीत कामाच्या पाहणीसाठी थेट ‘स्पॉट व्हिजिट’ करण्याचे आमंत्रण दिले आहे.
गडकरी यांनी देखील त्याची दखल घेत महामार्गाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दै.'लोकमत ' शी बोलताना दिली. पाटील म्हणाले की, पाटस ते बारामती व तोंडले बोंडले ते पंढरपूर या भागातील पालखी मार्गावरची रस्त्याची कामे अत्यंत दर्जेदार झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर बारामती ते इंदापूर व इंदापूर ते लुमेवाडी या पालखी मार्गाच्या कामाबद्दल खूप तक्रारी आहेत. दर्जेदार पध्दतीने काम झालेले नाही. संबंधित ठेकेदाराने ब-याच पोटठेकेदारांकडे कामांची जबाबदारी दिली आहे. होणारी कामे पहाण्यासाठी देखील ठेकेदार येत नाही.
या मार्गावर चार पाच अपघात झालेले आहेत. सर्वत्र अर्धवट कामे पडलेली आहेत. पालखी आलेली आहे. कामासंदर्भात लोकांच्या व कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत,असे पाटील म्हणाले. आजच्या दिल्ली भेटीत केंद्रीय रस्त वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेवून पालखी मार्गाच्या कामाबाबतची कैफियत त्यांच्यासमोर मांडली. आपले व भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांचे तक्रारीचे पत्र दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सूचना देऊन झालेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी करुन, त्या मार्गाची पाहणी करण्याचे निमंत्रण ही त्यांना दिले आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
हर्षवर्धन पाटील यांच्या पत्रातील मुद्दे
इंदापूर तालुक्यातून ७६ किलोमीटरचा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग जात आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक नागरिक व पदाधिका-याकडून निवेदन व तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे काम काही ठिकाणी नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून येत आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा प्रकल्प महत्वकांक्षी आहे. ते अंदाजपत्रकानुसार गुणवत्तापूर्ण व्हावे याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सूचना देऊन झालेल्या कामांची चौकशी करावी. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.