विठ्ठल नावाचा लागलासे छंद, पुण्यनगरीत अवघा आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 01:22 AM2018-07-09T01:22:52+5:302018-07-09T01:23:24+5:30
विठ्ठल नावाचा लागलासे छंद, नाही धरबंध काही अवघा आनंद ! मुक्त होऊनिया स्मरण, पायी विठ्ठलाचे शरण, गाऊनिया गुणगान, जीवालागी समाधान ! याच भावना मनी ठेवून पुणेकरांनी रविवारी वारकऱ्यांची सेवा करण्यात समाधान मानले आणि विठ्ठल नामाचा गजर करून अवघी पुण्यनगरी आनंदीमय केली.
पुणे - विठ्ठल नावाचा लागलासे छंद, नाही धरबंध काही अवघा आनंद !
मुक्त होऊनिया स्मरण,
पायी विठ्ठलाचे शरण,
गाऊनिया गुणगान,
जीवालागी समाधान !
याच भावना मनी ठेवून पुणेकरांनी रविवारी वारकऱ्यांची सेवा करण्यात समाधान मानले आणि विठ्ठल नामाचा गजर करून अवघी पुण्यनगरी आनंदीमय केली. वारकरीबंधूंची सेवा ती साक्षात् विठुरायाची सेवा. या भावनेतून कुणी एखाद्याची दाढी करतो, तर कुणी आजीबार्इंच्या पायाला तेल लावून मालिश करून देतो. कुणी त्यांचे कपडे धुऊन देण्याचे काम तितक्याच आनंदाने करीत होता. ‘‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल,’’याची प्रचीती त्यांच्या अगत्यशीलतेतून येते. पुणेकरांच्या सेवेने समाधानी होऊन पालखी सोहळा उद्या (सोमवारी) सकाळी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या दोन्ही पालख्या शहरात विसावल्या. दुसºया दिवशी (रविवारी) पालख्यांच्या दर्शनाकरिता भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. नाना पेठेतील निवडुंग विठ्ठल मंदिरात संत तुकाराममहाराजांची व भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात संत ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी मुक्कामाकरिता होती. पहाटे दोन्ही पालख्यांच्या पूजा, आरती झाल्यानंतर त्याच्या दर्शनासाठी प्रचंड रांग लागण्यास सुरुवात झाली. यात आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश होता. विशेष म्हणजे ज्येष्ठ भाविकांना दर्शनाकरिता तरुणांकडून सहकार्य मिळत होते. भवानी पेठ, नाना पेठेला यात्रेचे स्वरूप आल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. रस्त्याच्या कडेला खेळण्याची, सौंदर्यप्रसाधनांची, आयुर्वेदिक औषधांची, गृहोपयोगी वस्तूंची, कपड्यांची, खानपानाची दुकाने ओळीने लागलेली होती.
राजकीय व्यक्तींकडून दर्शन...
रविवारचा दिवस पोलीस, वाहतूक प्रशासन यांच्याकरिता प्रचंड धावपळीचा ठरला. राजकारणी नेत्यांची मोठी फौजच या दिवशी पुण्यात होती. यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आदी मान्यवरांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे दर्शन घेतले. यात विशेषत: शहा आणि मुख्यमंत्री यांच्याकरिता कडेकोट बंदोबस्त व सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र यामुळे सर्वसामान्य भाविकांच्या गर्दीला आवरताना पोलीसांच्या नाकी नऊ येत होते. अनेकांना गर्दीत चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागले.