पालखी प्रस्थान होणार जुन्याच मार्गाने
By admin | Published: July 20, 2015 03:56 AM2015-07-20T03:56:09+5:302015-07-20T03:56:09+5:30
प्रशासनाने केलेली तयारी, अधिकारीवर्गाने केलेल्या शिष्टाईला मान देऊन संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान जुन्याच मार्गाने ठेवण्याचा
इंदापूर : प्रशासनाने केलेली तयारी, अधिकारीवर्गाने केलेल्या शिष्टाईला मान देऊन संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान जुन्याच मार्गाने ठेवण्याचा निर्णय पालखीप्रमुखांनी घेतला, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना उपनगराध्यक्ष भरत शहा, गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी दिली.
बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव, विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, तहसीलदार सूर्यकांत येवले, गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या शिष्टमंडळाने आज (दि. १९) सायंकाळी निमगाव केतकी येथे जाऊन पालखीप्रमुखांची भेट घेतली. प्रस्थानाच्या रस्त्याच्या दुरुस्ती, स्वच्छतेच्या कामाची माहिती दिली. त्या रस्त्यावर पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी फुले अंथरण्यात येणार आहेत. सुवासिक अत्तराची फवारणी करण्यात येणार आहे. कडेने झालर बसविण्यात येणार आहे. याचीही माहिती पालखीप्रमुखांना देण्यात आली. प्रस्थानाचा जुना मार्ग बदलू नये, अशी विनंती अधिकारीवर्गाच्या शिष्टमंडळाने केली. त्या विनंतीस मान देऊन प्रस्थानाचा जुना मार्ग कायम ठेवण्याचा निर्णय पालखीप्रमुखांनी घेतला. पुढच्या वर्षी परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,आजच्या ‘लोकमत’मध्ये ‘पालखी नव्या मार्गाने नेण्यामध्ये पेच’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने खळबळ उडाली. पालखीच्या प्रस्थानाच्या मार्गावरून प्रस्थान करण्यास पालखीप्रमुखांनी नकार दिला होता. त्यामुळे भाविक नाराज होते. याच मुद्द्यावर पालखीप्रमुखांशी चर्चा केली. पालखी प्रस्थान पूर्वीच्या मार्गाने व्हावे. शेकडो वर्षांच्या परंपरेला छेद देऊ नये, पालखीप्रमुखांनी अट्टहासाचे धोरण सोडावे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यावर पालखीप्रमुखांनी आम्ही रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुक्काम करून तेथूनच प्रस्थान करू. पुढच्या वर्षी निमगाव केतकी येथून सराटी मुक्कामाकडे जाऊ, अशी हेकट भूमिका स्वीकारल्यानंतर वादावादीला सुरुवात झाली. पालखीप्रमुख आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास नाईलाजास्तव आम्हाला नेहरू चौकामध्ये आंदोलन करावे लागेल. अनुचित प्रकार घडल्यास त्यास पालखीप्रमुख जबाबदार राहतील, असा निर्वाणीचा इशारा शिष्टमंडळाने दिला. (वार्ताहर)