‘पॅनकार्ड क्लब’ गुंतवणूकदारांना मिळणार दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:51 AM2018-04-28T06:51:49+5:302018-04-28T06:51:49+5:30
सेबीने ९ मे २०१८ साठी पॅनकार्ड क्लब कंपनीच्या सुमारे २४ मिळकतींच्या आॅनलाइन लिलाव प्रक्रियेची जाहिरात दिली आहे.
धनकवडी : पॅनकार्ड क्लब कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या देशभरातील गुंतवणूकदारांना जून, जुलै २०१८मध्ये परतावा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती गुंतवणूकदारांचे पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या धनकवडीतील राष्टÑशक्ती संस्थेतर्फे देण्यात आली.
देशभरातील पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी लढणाºया धनकवडी येथील राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-आॅर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळाची नुकतीच मुंबई येथील सेबीच्या मुख्यालयात सेबीच्या अधिकाºयांसोबत बैठक झाली. सेबीने ९ मे २०१८ साठी पॅनकार्ड क्लब कंपनीच्या सुमारे २४ मिळकतींच्या आॅनलाइन लिलाव प्रक्रियेची जाहिरात दिली आहे. त्यामध्ये मिळकतींच्या किंमती ६० ते ७० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रशक्तीची सेबीचे मुख्य वसुली अधिकारी डी. व्ही. शेखर व तांडवा कृष्णा यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी संघटनेने अनेक प्रश्नांचा खुलासा सेबीकडे मागितला. सेबीकडे गुंतवणूकदारांच्या आलेल्या माहितीची छाननी पूर्ण केली असून, देशभरात फसलेल्या एकूण ५१ लाख गुंतवणूकदारांपैकी केवळ २५ लाख गुंतवणूकदार हे छोटे गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या लिलाव प्रक्रियेतून केवळ ३०० कोटी मिळाले, तरी त्यातून २५ लाख गुंतवणूकदारांचा परतावा जाऊ शकतो, अशी माहिती मुख्य वसुली अधिकारी डी. व्ही. शेखर यांनी राष्ट्रशक्तीच्या शिष्टमंडळाला दिली. राष्ट्रशक्तीने गेल्या दोन वर्षांत उभारलेल्या लढ्याला आता यश येताना दिसत आहे. पुढच्या २ ते ३ महिन्यांत २५ लाख गुंतवणूकदारांना परतावा मिळेल अशी आशा आहे, असे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी सांगितले.