नारायणगाव येथील पाणंद रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:09+5:302021-06-28T04:08:09+5:30
सरपंच योगेश पाटे यांनी येथील तांबे मळ्यातील १६५ शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला केल्याने काही दिवसांपूर्वी रंगविण्यात आलेल्या तथाकथित प्रकरणावर अखेर ...
सरपंच योगेश पाटे यांनी येथील तांबे मळ्यातील १६५ शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला केल्याने काही दिवसांपूर्वी रंगविण्यात आलेल्या तथाकथित प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे.
औटीमळा, डेरेमळा आणि तांबेमळा येथील अनेक शेतकऱ्यांमध्ये गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून आपल्या शेतात शेती कामासाठी जा-ये करण्यासाठी रस्त्यावरून वाद होता. येथील शेतकऱ्यांनी अनेकवेळा पोलीस संरक्षणात रस्त्याचे काम व्हावे म्हणून पोलीस उपस्थिती असावी म्हणून शासन नियमांच्या अधीन राहून अनेकवेळा पैसे भरले होते. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. येथील शेतकऱ्यांचे वाद न्यायालयीन तर आहेतच. परंतु स्थानिक पातळीवरही मिटविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, तंटामुक्ती समिती यांच्यावतीने मिटविण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला.
न्यायालयीन लढाईला लागणारा विलंब आणि रखडलेल्या कामामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. अखेर येथील जनता दरबारात प्रश्न मांडला गेल्याने स्थानिक सरपंच पाटे यांनी पुढाकार घेऊन तांबे, औटी आणि डेरे या शेतकऱ्यांना आपल्या शेतात मशागत व इतर शेतातील कामे करण्यासाठी आणि शेतातील शेतमाल मार्केटमध्ये नेण्यासाठी शेतकऱ्यांचा वावर व्हावा म्हणून रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न केला. अखेर हा वाद संपुष्टात आला आणि नारायणगावचे मंडलाधिकारी काळे, तलाठी सैद, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थित हा रस्ता करण्यात आला.
२७ नारायणगाव पाणंद रस्ता
पाणंद अंतर्गत नारायणगाव येथील तांबेमळ्यातील रस्त्याचे काम करण्यात आल्याने १६५ शेतकऱ्र्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.