पंढरीची वारी आनंद सोहळा! पुण्य उभे राहो आता!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:40+5:302021-07-03T04:08:40+5:30

आळंदी : पंढरीची वारी आनंद सोहळा! ...

Pandhari Wari Anand Sohala! Virtue stand up now !! | पंढरीची वारी आनंद सोहळा! पुण्य उभे राहो आता!!

पंढरीची वारी आनंद सोहळा! पुण्य उभे राहो आता!!

Next

आळंदी : पंढरीची वारी आनंद सोहळा!

पुण्य उभे राहो आता !!

संताच्या या कारणे

पंढरीच्या लागा वाटे!

सखा भेटे विठ्ठल !!

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९० व्या आषाढी वारी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सद्यस्थितीत कोरोनाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून यंदाचीही आषाढी पायी वारी रद्द करून गतवर्षीप्रमाणेच प्रस्थान सोहळा साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या पार्श्वभूमीवर वारीची परंपरा अबाधित राखण्यासाठी मोजक्‍या वारकऱ्यांच्या उपस्थितीत दहा संतांच्या पादुका विठ्ठलाच्या दर्शनाला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. २) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानने निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या चलपादुकांचे प्रस्थान ठेवले आहे.

प्रत्यक्षात प्रस्थान सोहळा म्हटलं की, संपूर्ण राज्यातून लाखो भाविक अलंकापुरीत दाखल होत असतात. शहरात किमान तीन-चार दिवस सगळीकडे वारकऱ्यांची गर्दीच गर्दी पाहायला मिळायची. मात्र कोरोना संसर्गामुळे यंदाही अलंकापुरीत वारकरी नाही. राहुट्या नाही. दिवसरात्र होणारा टाळ मृदंगाचा गजर नाही. हरिनाम नाही. अभंगही नाही. आळंदीत संचारबंदी लागू असल्याने भाविकांची तीर्थस्नानासाठी इंद्रायणीच्या काठावर गर्दी नाही. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेने यंदाही आगळावेगळा प्रस्थान सोहळा साजरा झाला आहे.

तत्पूर्वी, प्रस्थान सोहळ्याला शुक्रवारी पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. त्यानंतर माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. वीणामंडपात सकाळी दहानंतर भगवान महाराज कबीर यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.

ब्रम्हवृंदाच्या हस्ते माउलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. दरम्यान, शासनाने परवानगी दिलेल्या प्रस्थान संबंधित मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी आदींना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर शितोळे सरकारांसमवेत माऊलींचे मानाचे दोन्ही अश्व सन्मानपूर्वक मंदिरात आणून मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांच्या हातात सुपूर्द करून चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले.

वीणामंडपातून चलपादुका बाहेर आणल्यानंतर मंदिर आवारात निमंत्रित वारकऱ्यांच्या "ज्ञानोबा-माऊली - तुकारामांच्या" जयघोषात प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने परंपरेप्रमाणे पादुका लगतच्याच आजोळघरात (दर्शनमंडप) विविध फुलांनी सजविलेल्या चौथऱ्यावर विराजमान करण्यात आल्या. समाजआरती घेऊन पहिल्या दिवसाचा जागर करण्यात आला.

चौकट :

प्रस्थान सोहळ्याप्रसंगी प्रमुख विश्वस्त अभय टिळक, पालखी सोहळाप्रमुख विकास ढगे-पाटील, विश्वस्त योगेश देसाई, सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, मुख्याधिकारी अंकुश जाधव, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.

घंटानादाने पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ.

प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित वारकरी

मंदिराचा कळस व परिसरात फुलांची आकर्षक सजावट अन् रांगोळी

यंदाही ना फेर-फुगड्या... ना इंद्रायणी काठावर भक्तांचा महामेळा

पोलिसांचा कडेकोट चोख बंदोबस्त.

आजोळी सतरा दिवस प्रथेप्रमाणे दैनंदिन उपचार.

फोटो ओळ : माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी मंदिर आवारात माऊली नामाच्या जयघोषात दंग वारकरी. (दुसऱ्या छायाचित्रात) प्रस्थान सोहळ्याच्या विधिवत महापूजेनंतर माऊलींचे आकर्षण 'साजिरे' रूप.

(छायचित्र : भानुदास पऱ्हाड) ----------------------------------------------------------------

: विशेष वेगळे फोटो : १) आषाढी पायीवारी म्हटलं की, इंद्रायणी काठ भाविक तसेच वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून निघायचा. मात्र यंदा पायी वारी रद्द केल्याने हाच पवित्र इंद्रायणी तीर भाविकांविना सुना सुना झाला आहे. २) प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या मंदिराला फुलांची केलेली आकर्षक सजावट. ३) प्रस्थाननंतर पुढील सतरा दिवसांसाठी माऊलींच्या चलपादुका आजोळघरात विराजमान करण्यात आल्या आहेत. ४) पोलीस स्कॉडमध्ये कार्यरत असलेल्या 'विरु'ने माऊलींच्या मंदिरात भक्तीरूपी सॅल्यूट दिला.

(सर्व छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Pandhari Wari Anand Sohala! Virtue stand up now !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.