वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:09+5:302021-07-18T04:09:09+5:30
स्टार ९४३ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे यंदाही पंढरपूरची आषाढी वारी होत ...
स्टार ९४३
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे यंदाही पंढरपूरची आषाढी वारी होत नाही. याचा फटका वारकऱ्यांसह एसटी महामंडळालाही बसला आहे. वारीच्या काळात एसटीला मोठे उत्पन्न मिळते. राज्यभरातून मोठ्या संख्येने एसटी गाड्या पंढरपूरसाठी सोडल्या जातात.
राज्य परिवहन महामंडळ राज्यात विविध ठिकाणच्या उत्सव, जत्रांसाठी प्रवासी गाड्यांचे आयोजन करते. यात सर्वाधिक गाड्या या पंढरपूरच्या आषाढी यात्रेकरीता सोडण्यात येतात. यानंतर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी एसटी मोठ्या प्रमाणात विशेष गाड्या सोडते. यंदाच्या वर्षी पंढरपूरसाठी केवळ आठ गाड्या सोडण्यात येणार आहेत.
बॉक्स १
दरवर्षी आषाढी एकादशीसाठी पुण्याहून पंढरपूरसाठी जवळपास साडेतीनशे बस सोडल्या जातात. एसटी प्रशासन यासाठी आठवड्याभराचे नियोजन करत असे. या गाड्यांच्या जवळपास दोन हजार फेऱ्या होत. तसेच गोपाळकाला झाल्यावर काही वारकरी आपल्या गावी परतण्यासाठी एसटीचे आगाऊ बुकिंग करत. यातून पुणे विभागाला जवळपास तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळायचे.
बॉक्स २
जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या
आषाढी एकादशीसाठी पुण्यातून राज्यातले सर्वात मोठे दोन पालखी सोहळे प्रस्थान ठेवतात. एक असते आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर दुसरी असते देहूतून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी. या शिवाय सासवडमधून संत सोपानदेवांची निघणारी पालखीही महत्त्वाची असते. या तीन प्रमुख पालख्यांसोबत शेकडो दिंड्या आणि हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतात. बहुतांश वारकरी पंढरपूरपर्यंत चालत जातात. गावाकडे परतण्यासाठी मात्र यातले बरेचसे वारकरी एसटी किंवा अन्य वाहनांचा वापर करतात.
बॉक्स ३
यंदाही पालखी प्रस्थान एसटीने
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा सलग दुसऱ्या वर्षी राज्य सरकारने वारीला बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या पालख्या शिवशाही एसटीतून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहेत. एका पालखीसाठी दोन याप्रमाणे आठ शिवशाही गाड्या पंढरपूरला जातील.
बॉक्स ४
“दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या सेवेत एसटी गाड्या धावतात. यंदाच्या वर्षी देखील कोरोनामुळे आषाढी वारी परंपरेनुसार होणार नाही. गर्दी ओसरल्याचा मोठा आर्थिक फटका एसटीला बसणार आहे.”
-ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे
बॉक्स ५
“आषाढी वारीसाठी अनेक वारकरी चालत जातात. वयोमानानुसार आमच्यातले काही वाखरीपर्यंत एसटीने जातात. तिथून पुढे पायी जातात. आषाढीला पांडुरंगाचे दर्शन झाले की पंढरपुरातून परतताना मात्र सहसा एसटीचाच प्रवास असतो. मात्र गेल्या वर्षी आणि यंदाही कोरोनामुळे पंढरपुरात जाण्यावर निर्बंध आले. त्यामुळे आमची पंढरीची म्हणजेच एसटीची वारी चुकणार याची खंत वाटते.”
-हरीभाऊ चवरे, वारकरी, पुणे