पंढरीतला वृक्ष तरटी की वाघाटी? (मंथन लेख२)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:24+5:302021-07-24T04:09:24+5:30

तुळशीसह तरटी आणि वाघाटी ही दोन झाडे भगवंत पांडुरंगाला अतिप्रिय असल्याची श्रद्धा आहे. वाघाटीची किंवा गोविंदफळाची द्वादशीला भाजी करतात. ...

Pandharitala tree Tarti or Waghati? (Manthan Article 2) | पंढरीतला वृक्ष तरटी की वाघाटी? (मंथन लेख२)

पंढरीतला वृक्ष तरटी की वाघाटी? (मंथन लेख२)

googlenewsNext

तुळशीसह तरटी आणि वाघाटी ही दोन झाडे भगवंत पांडुरंगाला अतिप्रिय असल्याची श्रद्धा आहे. वाघाटीची किंवा गोविंदफळाची द्वादशीला भाजी करतात. तरटी आणि वाघाटी या दोन्ही वनस्पती वेगवेगळ्या आहेत का? पंढरपुरात जुना तरटी वृक्ष वाळून गेला होता. नुकतेच आषाढी एकादशीला पंढरपूरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तरटी वृक्षारोपण करण्यात आले त्यानिमित्ताने या दोन वनस्पतींतील फरक स्पष्ट करणारा हा लेख...

प्रा. किशोर सस्ते

---------------

तरटी नि वाघाटी या वनस्पतींत फरक आहे की दोन्ही एकच आहेत, हा प्रश्न भक्त, वनस्पती अभ्यासकांत संभ्रम निर्माण करतो. तरटी हा वृक्ष कान्होपात्रांचे झाड व भगवान श्री विष्णूंचे झाड म्हणून ओळखले जाते. या वृक्षाच्या नावाने विठ्ठल मंदिराच्या एका दरवाज्यास ‘तरटी महाद्वार’ असे नाव आहे. आपण तरटी (कपॅरिस डायव्हेरिकॅटा) आणि वाघाटी (कपॅरिस झायलॅनिका) मध्ये वनस्पतीशास्त्रीय आणि आध्यात्मिक फरक काय आहे ते पाहू. तरटी हा वृक्ष आहे तर वाघाटी किंवा ‘गोंविंदफळ’ ही आधारावर वाढणारी मोठी वेल किंवा ‘महालता वनस्पती’ आहे. दोन्हींची फळे हिरवी, पेरूसारखी व पिकल्यावर लाल होतात व त्यामध्ये सीताफळासारखा पांढरा गर असतो. तरटीला पिवळी फुले येतात तर वाघाटीला नुकतीच उमटलेली पांढरट फुले नंतर काही दिवसांनी लाल रंगाची होतात. तरटीच्या उल्लेख ग्रंथामधील ओव्यांत आढळतो.

संत कान्होपात्रा पंढरपूराला गेलेल्या असताना त्यांच्या सौंदर्यांची ख्याती ऐकून त्यांना आपल्या दरबारी आणण्यासाठी बिदरच्या बादशाहने पंढरपुरावर आक्रमण केले. हा वृत्तांत संत कान्होपात्रा यांना समजला व‌ देवाकडे चरणी लीन होण्याची प्रार्थना करत देवाला आळवले व आपला देह पंढरपुरात ठेवला व त्याचा तरटी वृक्ष झाला, असा उल्लेख ‘भक्तिविजय’ या ग्रंथामधील ३९ अध्यायामधल्या ४७ आणि ७६ व्या ओव्यांत सापडते...

तिचें प्रेत अवसरीं ॥ नेऊनि पुरिलें दक्षिणद्वारीं ॥ त्याचा वृक्ष ते अवसरीं ॥ तरटी झाड उगवलें ॥४७॥ मागुती बोले पुजाऱ्यासी ॥ कान्हो वृक्ष जाहली कैसी॥ त्यांनीं दक्षिणद्वारापासीं तरटीवृक्ष दाखविला ॥७६॥ तसेच पुणे जिल्ह्यातील निरा नरसिंगपूर येथे श्रीकृष्णाचे अवतार भगवान नृसिंह यांचे मंदिर आहे त्यास ‘तरटी नरसिंह’ असे म्हणतात. मंदिरात मोठा ओटा असुन त्याच्या मध्यभागी तरटी वृक्ष आहे त्याच्या खाली श्रींच्या चार पादुका असून मंदिराशेजारच्या दुसऱ्या तरटी वृक्षास पार बांधलेला आहे. मोरया गोसावी गणपती मंदिर चिंचवड येथेही हा वृक्ष आहे. तसेच मोरगाव गणपती येथे हा वृक्ष कल्पवृक्ष मानतात. ह्या वृक्षास ‘चिंधी देवाचं झाड’ म्हणूनही ओळखतात. वाघाटीची महती आणि पाककृती जात्यावरील किंवा मौखिक ओव्यांमध्ये तसेच ग्रंथामध्येही आढळते.

एकादशीला वाघाट्याची भाजी करण्याची वेगवेगळया प्रांताची पद्धत ह्या मौखिक ओव्यांतून दिसते. अशा ओव्यांमधील पाककृती असणारा हा वेगळाच ठेवा आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका गाव टाकवे व‌ शिरूर तालुक्यांतील धामारी गावातील दळणकांडातल्या व मौखिक ओव्यांतून वाघाटी हा वेल आहे असे पुढील ओव्यांतून समजते, आषाढी एकादशी माझ्या विठ्ठल लालाला। रुक्मिणी लावी शेडी वाघाटीच्या वेलाला।। बऱ्याच वेळा काटे असल्यामुळे आणि वेलवर्गीय असल्यामुळे ती फळभाजी काढायची‌ कशी, असा प्रश्न येतो म्हणूनच अवघड ठिकाणी शिडी लावतात. केशेगाव (जि. उस्मानाबाद) येथील आजीच्या ह्या मौखिक ओव्यांतून वाघाटीचा रस्सा करण्याची पद्धत दिसते.

आळंदीच साधु आलत लई दिसा ।।

आखाड्या बारशीला केला वाघाट्याचा रसा।।

सुकी भाजीही करतात असं सांगताना त्या म्हणतात

आळंदीचं साधु आलतं बक्कळ।

कानड्या रुखमीणीनं केलं वाघाट मोकळं।।

पाहुण्यांचे स्वागत खर‌ तर गोड पदार्थाने करावे पण द्वादशीला जर पाहुणा आला तर हा कडू रसच घ्यावा. कारण उपवासामुळे पित्त प्रकृती वाढते असं ह्यातून समजत. ही पाककृती तळून देखील करतात कारण भाजी ज्यांला आवडत नाही त्यासाठी वाघाटीची तळुन भजीसारखी पाककृती देखील होऊ शकते, आळंदीचे साधु आलेत मिळुनीl

कर वाघाट तळुन कानड्या रुखमीणीll‌. तसेच पंढरपुर जवळ असणाऱ्या देवडी मोहोळ येथील आजी श्रीमती कलावती थोरात यांच्याकडून तरटी आणि वाघाटी वेगळी असल्याची माहिती मिळाली. इ.स १४४८ मध्ये मंगळवेढ्याचे संत दामाजीपंत यांनी भुकेने व्याकूळ होऊन दारी आलेल्या एका याचकास अनेक प्रकारची पक्वान्नं खाऊ घातली. २६ प्रकारच्या भाज्यांचे वर्णंन ओव्यांमध्ये आढळते त्यात वाघाटीचा उल्लेख आहे. १९०३ ‘फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’ या पुस्तकामध्ये वाघाटी गोविंदफळ अशी वनस्पती आळंदीमध्ये आहे अशी नोंद आढळते. चांगल्या आरोग्यासाठी संत रामदास महाराजांनी आपल्या ओव्यांमध्ये ३०० प्रकारच्या भाज्या, फळे व औषधी वनस्पती परसबागेत लावायला सांगितले आहे त्यात देखील तरटी आणि वाघाटीचा उल्लेख वेगवेगळा आढळतो. ह्या सगळ्या संदर्भामधून तरटी आणि वाघाटी दोन वेगवेगळ्या वनस्पती आहेत, असे समजते. ‘फ्लोरा ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट’ या वनस्पतींची नोंद असणाऱ्या पुस्तकात दोन्ही वनस्पती तेथे आढळतात, असे नमूद आहे. परंतु ‘कपॅरिस डायव्हेरीकॅटा’ या वनस्पतींचा तरटी असा उल्लेख नाही. पंढरपूरमधला वृक्ष तरटी आहे का वाघाटी हे जाणून घेण्यासाठी वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासकांनी जो जुन्या वृक्षाचा बुंधा आहे त्यांच्या आंतरिक संरचनेचा अभ्यास सूक्ष्मदर्शकाखाली करायला हवा व त्या संरचनेची तुलना तरटी व वाघाटीशी करायला हवी, त्याशिवाय हे कोडे उलगडणार नाही.

(लेखक वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक आहेत)

Web Title: Pandharitala tree Tarti or Waghati? (Manthan Article 2)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.