Pandharpur Chi Wari: देहूतून पालखीचे प्रस्थान :तुकोबांसंगे वैष्णव निघाले पंढरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 05:41 AM2019-06-25T05:41:04+5:302019-06-25T05:41:44+5:30
सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून वैष्णवांच्या मांदियाळीसह जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले.
- विश्वास मोरे
देहूगाव (जि. पुणे) - भगव्या पताका आसमंती फडकवीत टाळ-मृदंगाचा कल्लोळ आणि वीणेचा झंकार करीत, ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करीत सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून वैष्णवांच्या मांदियाळीसह जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले.
‘भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी देहूनगरी आज नादावली’ अशी अनुभूती देहूनगरीत सोमवारी आली. वैष्णवांच्या गर्दीने इंद्रायणीतीर भक्तिमय झाला होता. प्रस्थान सोहळा असल्याने सकाळपासूनच देहूनगरीत एक वेगळेच चैतन्य जाणवत होते. ढगाळ वातावरण आणि उकाडाही जाणवत होता. असे असतानाही वारीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. तत्पूर्वी सोमवारी पहाटे नैमित्तिक महापूजा झाली. श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानाच्या वतीने सोहळाप्रमुख संजय मोरे, काशिनाथ मोरे, अजित मोरे यांनी शिळा मंदिरात महापूजा केली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायणमहाराज यांच्या समाधी मंदिरात विश्वस्त माणिक मोरे, विशाल मोरे, संतोष मोरे यांनी महापूजा केली.
घोडेकर सराफ यांच्याकडे झळाळी देऊन महाराजांच्या पादुका मानकरी म्हसलेकर यांनी इनामदार वाड्यात सकाळी दहाच्या सुमारास आणल्या. तिथे दिलीपमहाराज गोसावी (मोरे) इनामदार यांच्या हस्ते विधिवत पूजा केली. तोपर्यंत मुख्य मंदिरातील वीणा मंडपात हभप रामदास नाना मोरे यांचे काल्याचे कीर्तन सुरू होते.
सकाळपासूनच इंद्रायणीत स्रान करून वारकरी मंदिरात दर्शन घेण्यास येत होते. प्रस्थानाची वेळ जवळ येऊ लागली, तशी मंदिराच्या आवारात दिंडीकऱ्यांची गर्दी होऊ लागली. टाळ-मृदंगाचा कल्लोळ सुरू झाला. वीणेचा झंकाराने वातावरण भक्तिमय झाले. अडीचला प्रस्थान सोहळा सुरू झाला. या वेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, देवस्थानाचे अध्यक्ष मधुकर मोरे आदी उपस्थित होते.
सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू...’ असे म्हणत श्रीक्षेत्र देहूगाव येथून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळ्याने सोमवारी सायंकाळी पावणेसहाला पंढरीकडे प्रस्थान ठेवले. टाळ-मृदंग, हरिनाम गजराने अवघी देहूनगरी भक्तिमय झाली होती. वीणामंडपातून पालखी बाहेर आल्यानंतर दर्शनासाठी लोटलेली वारकऱ्यांची गर्दी.