परमेश्वराशी एकरूप होणे हेच ज्ञानी भक्ताचे साध्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 11:08 AM2019-06-30T11:08:04+5:302019-06-30T11:14:07+5:30
भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ! रंगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा…..!
अमोल अवचिते
सासवड - भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ! रंगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा…..! गावातील नागरिक दरवर्षी आळंदीहुन पंढरपूरला जात असत. वारीहून ते आले की, गावातील सगळ्या मंडळींसोबत मीही त्यांच्या भेटीला जात. चेहऱ्यावरील आनंद, उत्साह पाहून नेमके वारीत यांना काय भेटले असेल, असा विचार नेहमी मनात उभा राहत.. पण त्यांना हा प्रश्न विचारला की ते 'काय भेटते हे शब्दात सांगता येणं एवढं सोपं नाही, तू स्वतः एकदा वारीला येऊन अनुभव घे' मग समजेल असे ऐकवत असत.. मग मनाशी एकदा तरी वारी करायचीच हा निश्चय करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत सहभागी झालो आणि विठु माऊलीचा लागला लळा, काय सांगू पंढरी महिमा...फलटणचे अरुण ननावरे यांचा हा अनुभव...
सासवड ठायी माऊलींचा मुक्काम असताना रात्री ननावरे यांच्याशी भेट झाली अन् हा आठवणींचा आणि विठू माऊलींच्या वात्सल्याचा पान्हा रिक्त केला.. ते सांगतात... घरच्या अडचणी, काळजीमुळे मी घराबाहेर पाय ठेवला नाही. साडेतीन एकराची शेती आहे. शेतात पिकलं तर पिकलं नाही तर जळून गेलं, अशा अवस्थतेत आला दिवस ढकलत होतो... मात्र, वयाच्या ३६ व्या वर्षी २००३ ला मला वारीला जावं असं वाटलं.... सुरुवातीला शंभर लोकांसह वारीला ते आले. आता संख्या वाढली आहे. पहिल्या वर्षी हरिपाठ पाठ नव्हते. म्हणून वारीत काय चालले आहे ते समजत नसत... पण जसजशी पालखी पुढे जात होती, तसा उत्साह वाढत होता आणि चिंता मिटत गेली... वारीत चालताना आनंद वाटायला लागला. पूर्वीपेक्षा सध्या वारीत तरुण पोरा पोरींची संख्या वाढली आहे... जणू त्यांना ही विठुमाऊलीने भक्तीचा टिळा लावला आहे... तसेच आमच्या आरोग्याची काळजी घेत चांगल्या सोयी सुविधा देखील दिल्या जात आहे. हरिपाठ, अभंग आता तोंडपाठ झाले आहेत. हरिनामाच्या घोषाने वारीत आल्यानंतर सर्व गोष्टींचा विसर पडतो. घरची काळजी, आठवण येत नाही.
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर
चालला नामाचा गजर...
तीन मुलांचे इंजिनिअरिंग झाले आहेत. ते पुण्याला नोकरीला आहेत. ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायात माऊली ज्ञानेश्वर भक्तांचे वर्णन करताना म्हणतात 'तो पहिला आर्तु म्हणिजे! दुसरा जिज्ञासू बोलिजे| तिजा अर्थार्थी जाणिजे| ज्ञानिया चौथा' मनोभावे भक्ती करणारा भक्त आणि याचक भक्तामधला सूक्ष्म फरक माऊलींनी सांगितला आहे. पांडुरंगाकडे काही मागायचं नाही, काही मिळवायचं नाही, कसली लालसा नाही केवळ नामस्मरणाने भेदाभेदरुपी अहंकार दूर करून परमेश्वराशी एकरूप होणे हेच ज्ञानी भक्ताचे साध्य असते.