पंढरीचा पोहा आला अलंकापुरी। पंचक्रोशावरी साधुजन।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:18 AM2018-12-21T01:18:03+5:302018-12-21T01:18:25+5:30

अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणेला शनिवारपासून प्रारंभ : २२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत १९० किलोमीटरचा पायी प्रवास

The Pandharpura Poha came from Alankapuri. Panchkoshwari Sadhujan .. | पंढरीचा पोहा आला अलंकापुरी। पंचक्रोशावरी साधुजन।।

पंढरीचा पोहा आला अलंकापुरी। पंचक्रोशावरी साधुजन।।

googlenewsNext

आळंदी : आळंदी-पंढरी महिना वारकरी, वारकरी शिक्षण संस्थेतील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा हरिनाम गजरात साजरी होत आहे. या वर्षी प्रदक्षिणेस माऊली मंदिरातून शनिवारी (दि. २२) दत्तजयंतीच्या दिवशी प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याची सांगता ३१ डिसेंबर रोजी आळंदी मंदिरात होईल, अशी माहिती हभप बापूसाहेबमहाराज डफळ यांनी दिली.

पंचक्रोशी प्रदक्षिणा पुणे जिल्ह्यातील खेड, हवेली, मुळशी, मावळ, शिरूर अशा ५ तालुक्यांतून वारकऱ्यांसमवेत सोहळा रुपी सुरू आहे. या वर्षी २२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत १९० किलोमीटरचा प्रवास या पंचक्रोशीतून प्रदक्षिणेत हरिनाम गजर होणार आहे. या प्रदक्षिणा सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. यात काकडा, गौळणी, भजन, भोजन, विश्रांतीत ज्ञानेश्वर माऊली कदम यांची प्रवचने, नेमाचे भजन, हरिपाठ तसेच मुक्कामाच्या ठिकाणी हरिकीर्तन होणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या संजीवन समाधीप्रसंगी जे महान साधू, संत, ऋषिमुनी, देव, देवता, गण, गंधर्व, यक्ष-किन्नर आले असता त्यांच्या वास्तव्याने अलंकापुरी पंचक्रोशी व्याप्त होती. तेव्हा संत नामदेवमहाराज यांच्यासह इतर साधू संत आणि देवदेवता यांनी जी प्रदक्षिणा केली तीच ही अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा होय. या पुण्यपावन पंचक्रोशी प्रदक्षिणेचे आयोजन माऊलींच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य हैबतरावबाबा यांच्या प्रेरणेतून पुढे १८३६पासून पुढे ४ पिढ्या गोविंद नेर्लेकर परिवार यांनी प्रदक्षिणा सुरू ठेवली. मात्र, पुढे १९६४मध्ये खंडित झालेली ही अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा ४८ वर्षांनंतर २०१२पासून वारकरी, भाविकांच्या आग्रहावरून हभप बापूसाहेब डफळ यांनी ही प्रदक्षिणा एक सोहळा या रूपात सुरू केली. दरम्यानच्या काळात आळंदी-पंढरीचे वारकरी वै. रोकडोबा दादामहाराज, वै. श्रीरंग बुवामहाराज आदींनी तसेच अनेक वारकरी, भाविकांनी आपापल्या सोयीनुसार वैयक्तिक स्वरूपात प्रदक्षिणा केली आहे. सध्या या पंचक्रोशी प्रदक्षिणेत मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होत असल्याचे हभप बापूसाहेबमहाराज डफळ यांनी सांगितले.

हभप कदम माऊलीमहाराज यांच्या आग्रहावरून येथील वारकरी शिक्षण संस्थेतील आजी-माजी विद्यार्थी सहभागी होऊ लागले आहेत.

माऊली मंदिरातून शनिवारी (दि. २२) सकाळी नऊ वाजता हरिनाम गजरात ही प्रदक्षिणा सुरू होईल. पहिला मुक्काम मरकळ येथील श्री केशवराजमहाराज मंदिरात होईल. दुसरा मुक्काम दि. २३ रोजी चंदननगर खराडी, पाषाण- दि. २४, गहुंजे- दि. २५, थोपटवाडी करंजविहिरे- दि. २६, होलेवाडी- दि. २७, केंदूर- दि. २८, मरकळ- दि. २९, श्री ज्ञानेश्वरमहाराज मंदिर आळंदीत आगमन व मुक्काम- दि. ३० आणि प्रवास समाप्ती होईल. सोमवारी (दि. ३१) सकाळी माऊली मंदिरात काल्याच्या कीर्तनाने या पंचक्रोशी प्रदक्षिणेची सांगता होणार असल्याचे डफळमहाराज यांनी सांगितले.

Web Title: The Pandharpura Poha came from Alankapuri. Panchkoshwari Sadhujan ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.