देशाच्या सीमेबाहेर आवाज पोहोचला अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे पंडितजी आणि लता मंगेशकर : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 06:25 PM2021-02-06T18:25:08+5:302021-02-06T18:25:31+5:30
राजकीय क्षेत्रात काम करताना मराठी आणि कानडी अशा वादात अडकवले जाते. पण हे अंतर न ठेवता संगीताच्या माध्यमातू एकसंध ठेवण्याची कामगिरी पंडितजींनी केली.
पुणे : देशाच्या सीमेबाहेर त्यांचा आवाज पोहोचला अशी दोन व्यक्तिमत्व आहेत एक पंडितजी आणि दुसरे लता मंगेशकर.जोपर्यंत चंद्र सूर्य मावळत नाहीत तोपर्यंत त्यांचे सूर अबाधित राहातील. यशवंतराव चव्हाण यांच्या घरी मैफिल व्हायची, त्याचा आस्वाद घ्यायला मिळायचा. सुस्वभावी, प्रेमाचा ओलावा त्यांच्यात असायचा, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने 'स्वरभास्कर' पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दोन दिवसीय ' अभिवादन' कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे , पुण्याचे महापौर मुर्लीह्र मोहोळ उपस्थित होते.
पवार म्हणाले, कोरोना संकट नसते तर आजचा कार्यक्रम आगळावेगळा असता संगीताच्या माध्यमातून आयुष्य खर्ची करून त्यांनी रसिकांना आनंद दिला राजकीय क्षेत्रात काम करताना मराठी आणि कानडी अशा वादात अडकवले जाते. पण हे अंतर न ठेवता संगीताच्या माध्यमातू एकसंध ठेवण्याची कामगिरी पंडितजींनी केली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
जावडेकर म्हणाले, एक काळ असा होता की दूरदर्शन नव्हते पण आकाशवणीतून संगीत सर्वदूर पोहोचायचे त्यातूनच पंडितजी, बाबूजी यांचे संगीत घराघरात पाहोचले..अभंगवाणी मधून पंडिजींचे सूर ऐकायला मिळणार म्हणून लोक हातातले काम टाकून त्यांच गाणं ऐकायला बसत असत.
पंडितजींचे सूर चिरकालीन कसे राहतील याचा विचार करावा लागेल
पंडित भीमसेन जोशी म्हणजे संगीतातला अखेरचा शब्द आहेत. संगीतात जीवनाची प्रेरणा आहे. पुण्यात गणेशोत्सवात पंडितजींनी अनेक गणेश मंडळाच्या कार्यक्रमात रस्त्यावर येऊन गानसेवा केली आहे. इतका त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. ध्येयासाठी अपार मेहनत घेतली.अटलबिहारी वाजपेयींना पंडितजी आवडायचे. कलाकारांचा सन्मान ज्या देशात होतो तो देश पुढे जातो..कलाकारांचा सन्मान करणे हा देशाची मान उनव्हाबण्याचा क्षण आहे. पंडितजींचा अमूल्य ठेवा आकाशवाणी आणि दूरदृशनकडे आहे तो यूट्यूब वर टाकला जाणार आहे. लवकरच सामान्यांच्या हातात हा ठेवा पडावा अशी योजना आम्ही करीत आहोत..तसेच दरवर्षी आम्ही आकाशवाणी संगीत संमेलन आयोजित करतो अनेक वेळा पंडितजी या संमेलनात सहभागी झाले आहेत. पंडितजींच्या जन्मशताब्दीनिमित्त यापुढील काळात हे संमेलन 'पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन म्हणून ओळखले जाईल'. पंडितजींचे गाणं हेच त्यांचे स्मारक आहे. हे कलाकार देशाची संपत्ती आहेत ती अक्षय करण्याचा प्रयत्न करू असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, शास्त्रीय संगीताचे शास्त्र अबाधित ठेवून त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे श्रेय पंडितजींना जाते..संगीताची सात्त्विकता त्यांनी जपली..किराणा घराण्याचे असूनही कोणतेही घराणं वावडं मानलं नाही..घरणेशाहीला जुमानल नाही..शास्त्रीय संगीताशी मैत्री होऊ शकते हा विश्वास त्यांनी सामान्यांना दिला..भारताच्या सौम्य शक्तीची त्यांनी जगाला प्रचिती दिली. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आंतरराष्ट्रीय पाठयवृत्ती घोषित करत आहोत दीड लाख रुपयांची पाठयवृत्ती देण्याची योजना जून महिन्यापासून सुरू होईल. परदेशातून एखादा कलाकार भारतात शास्त्रीय संगीत शिकायला येईल त्याला ही पाठयवृत्ती दिली जाईल.